सम तारखेला स्त्रीसंग झाला तर पुत्रप्राप्ती होते, या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडलेल्या निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या (Indurikar Maharaj) प्रकरणावर आज (18 सप्टेंबर) संगमनेर सत्र न्यायालयात (Sangamner Sessions Court) सुनावणी होणार आहे. दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दाखल केलेली हस्तक्षेप याचिका अर्जावर न्यायालय आज काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा होतो आणि विषम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होते, असे वादग्रस्त विधान इंदोरीकर महाराजांनी केले होते. यावर अनेक सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलनातील कार्यकर्त्यांनी इंदोरीकरांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर PCNDT कायद्याअंतर्गत संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला. आज सत्र न्यायालयात तिसरी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी तयारी करण्यात आली आहे, आरोग्य विभागाचे विधी सल्लागार अधिकारी सरकारी वकीलांशी समन्वय साधणार आहेत. दरम्यान ही सुनावणी ऑगस्ट महिन्यात होणार होती. मात्र ती रद्द झाल्याने आजच्या दिवशी सुनावणी पार पडणार आहे.
नेमकं काय म्हणाले होते इंदोरीकर महाराज?
"स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते." या वक्तव्याच्या व्हिडिओ देखील समोर आला होता. नवी मुंबईतील उरणमध्ये येथे हे वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं होतं. (गर्भलिंग निदानाच्या 'ऑड-इव्हन फॉर्म्युला'बाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन इंदोरीकर महाराजांची पलटी, असे बोललो नसल्याचा खुलासा)
दरम्यान या वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराज यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. तसंच कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमा करावी असे ते म्हणाले होते. मात्र या वादात त्यांचे समर्थक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. तसंच इंदोरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त करुन देखील महाराजांची नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोपही समर्थकांनी केला होता.