![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/05/Raj-Thackeray-380x214.jpg)
Avinash Jadhav Hunger Strike News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: 2016 मध्ये टोल दरवाढीविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल करुन भूमिका घेतली होती. मग, आता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यानी दरवाढीचा विरोध मागे का घेतला? कोणाच्या सांगण्यावरुन? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विचारला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी टोल दरवाढीविरोधात उपोषण सुरु केले होते. या वेळी राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर ते ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांना उपोषण मागे घेण्याची सूचना केली. तसेच, उपोषण वगैरे हे आपलं काम नव्हे. ज्या लोकांना टोल दरवाढीचा त्रास होत नाही. जे लोक टोल वाढवतात त्याच लोकांना ही माणसं निवडून देतात. पुन्हा पुन्हा सत्तेत बसवतात. त्यांना कोणतीही भूमिका नसते. असा लोकांसाठी आपला जीव धोक्यात घालणे योग्य नव्हे. या लोकांना एखादा माणूस आपल्यासाठी मेला तर त्याने काहीही फर पडणार नाही. त्यामुळे उगाचच उपोषण वगैरे करुन जीव धोक्यात घालू नये, असा सल्या त्यांनी जाधव यांना दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचेच आहेत. त्यांना इथल्या सर्व गोष्टींची कल्पना आहे. शिवाय, 2016 मध्ये त्यांनी स्वत: टोल दरवाढीविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. आम्ही त्यांच्याशी संपर्क केला आहे. येत्या दोन चार दिवसांमध्ये माझी त्यांच्यासोबत भेट होईल. या भेटीमध्ये हा मुद्दा मी सवीस्तरपणे त्यांच्यापुढे विस्ताराने मांडेण, त्यानंतर आपल्याशी बोलेन, असेही राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले. दरम्यान, त्यांनी या वेळी इतर कोणत्याही विषयावर भाष्य करण्यास नकार दिला. सध्या टोलचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला हा विषय इकडेतिकडे सरकू द्यायचा नाही. परिणामी आजच्या पत्रकार परिषदेत मी केवळ टोलवरच बोलेण. इतर कोणत्याही विषयावर बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
पाठिमागील काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील टोल दरवाढ हा अनेकांच्या चर्चेचा विषय झाला आहे. अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठाणे मनसे या मुद्द्याविरोधात आक्रमक झाली आहे. त्यामुळे जाधव यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी पोलीस प्रशासनाकडे उपोषणासाठी रितसर परवानगी मागितली. परंतू, त्यांना ती मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी मुलूंड येथे उपोषण सुरु केले. जे राज ठाकरे यांच्या सूचनेनंतर मागे घेण्यात आले.