Raj Thackeray On Nanded Hospital Tragedy: नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणावरून (Nanded Hospital Tragedy) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknarh Sinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. तीन इंजिन बसवूनही महाराष्ट्राचे आरोग्य व्हेंटिलेटरवरचं आहे. तिन्ही पक्षांनी स्वत:चा पुरेसा विमा उतरवला आहे, त्यामुळेच त्यांना महाराष्ट्राची चिंता नाही, अशी टीकाही राज ठाकरेंनी महायुतीवर केली आहे.
राज ठाकरे यांनी ट्विटर पोस्टमध्ये लिहिले आहे की, गेल्या 24 तासांत नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशीच एक घटना नुकतीच ठाणे शहरात घडली होती. शहरात औषधांचा तुटवडा आहे. राज्यात सरकारी रुग्णालयांचा तुटवडा आहे. मुंबईतही क्षयरोगाच्या औषधांचा तुटवडा असल्याने औषध सावधगिरीने वापरा असा सल्ला दिला जात आहे. या घटना केवळ नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या मर्यादित नसून त्या राज्यात सर्वत्र आहेत. (हेही वाचा - Nanded Hospital Tragedy: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे थैमान सुरूचं; 1 ते 2 ऑक्टोबर दरम्यान आणखी 7 रुग्णांचा मृत्यू)
राज ठाकरे यांनी पुढे म्हटलं आहे की, तीन इंजिन बसवूनही राज्याचे आरोग्य जर व्हेंटिलेटरवरच अवलंबून राहिले, तर या तीन इंजिनांचा उपयोग काय? सरकारमधील तिन्ही पक्षांनी स्वत:चा पुरेसा विमा उतरवला असल्याने त्यांना काळजी नाही, पण महाराष्ट्राचे काय? दुर्दैवाने सरकारमधील तिन्ही पक्ष ठणठणीत आहेत. पण महाराष्ट्र आजारी आहे. सरकारने आयुष्य वाढवण्याचे प्रयत्न कमी करून महाराष्ट्राचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात 48 तासांत मृतांची संख्या 31 झाली आहे. रुग्णालयातील या घटनेनंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून हल्ले सुरूचं आहेत. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदे सरकारवर टीका करताना या घटनेने सरकारचे अपयश उघड होत असल्याचे म्हटले आहे. शरद पवार म्हणाले की, रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात एकाच रात्रीत 18 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती, मात्र ही घटना गांभीर्याने न घेतल्याने अशीच गंभीर घटना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात घडली.