Nanded Hospital Tragedy: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे थैमान सुरूचं; 1 ते 2 ऑक्टोबर दरम्यान आणखी 7 रुग्णांचा मृत्यू
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Nanded Hospital Tragedy: नांदेड (Nanded) येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) 24 तासांच्या कालावधीत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आल्यानंतर, 1 ते 2 ऑक्टोबर दरम्यान आणखी सात जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृत रुग्णांची संख्या 31 झाली आहे. नांदेडच्या जिल्हा माहिती कार्यालयाने (DIO) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याची पुष्टी केली. याआधी, नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत 24 तासांत 24 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. 24 मृतांपैकी 12 बालके आहेत, असे महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.

सोशल मीडिया पोस्टमध्ये, नांदेड डीआयओने म्हटले आहे की, डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूशी संबंधित तथ्य खालीलप्रमाणे आहे: 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान 24 मृत्यू, 1 ते 2 ऑक्टोबर दरम्यान सात मृत्यू. कृपया घाबरू नका. डॉक्टरांची एक टीम तयार आहे, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा - Nanded Hospital Deaths: नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासांत तब्बल 24 रुग्ण दगावले; मृतांमध्ये 12 बाळांचा समावेश)

दरम्यान, आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करत राज्य सरकारकडे या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी 7 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांमध्ये 4 बालकांचाही समावेश. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी.'

महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झालेल्या मृत्यूबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मुश्रीफ यांनी म्हटलं आहे की, आम्ही या घटनेची सखोल चौकशी करू. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत माहिती दिली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी डॉक्टरांची एक समिती स्थापन करण्यात येईल.

दरम्यान, आज मुश्रीफ नांदेड येथील जीएमसीएचला भेट देणार आहेत. हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर ते पत्रकार परिषदेलाही संबोधित करतील, असे जिल्हा अधिकाऱ्याने सांगितले. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान रुग्णालयात एकूण 24 मृत्यूची नोंद झाली आहे. यात 12 प्रौढांपैकी पाच पुरुष आणि सात स्त्रिया आहेत. चार प्रौढांना हृदयाशी संबंधित आजार होते, एकाला विषबाधा झाली होती, एकाला यकृताची समस्या होती, दोन मूत्रपिंडाचे रुग्ण होते. यात तीन अपघाताची प्रकरणे होती. मृत अर्भकांपैकी चार जणांना शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात आणण्यात आले होते, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने निवेदनात म्हटले आहे.

या घटनेने महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेवर प्रकाशझोत टाकला असून, विविध राजकीय व्यक्तींकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शिवसेनेचे (यूबीटी) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला. काँग्रेस नेते अतुल लोंढे पाटील यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. लोंढे यांनी म्हटलं आहे की, आजच्या माहितीनुसार नांदेडच्या रूग्णालयात आणखी 12 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. आता एकूण मृतांची संख्या 24 झाली आहे. हे केवळ राज्यातील विद्यमान सरकारच्या व्यवस्थापनाच्या आणि प्रशासनाच्या अभावामुळे आहे. हे सरकार मुख्यतः इव्हेंट तयार करण्यात आणि मथळे व्यवस्थापित करण्यात गुंतलेले आहेत. अलीकडे, त्यांनी एक नवीन रुग्णालय सुरू केले आहे ज्यात नांदेरमधील अर्ध्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. रुग्णालयात वैद्यकीय उपकरणांची कमतरता आहे. औषधांचा आणि डॉक्टरांचा तुटवडा आहे. त्यामुळे या घटनेला राज्यातील विद्यमान सरकारच जबाबदार आहे.