Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रातील नांदेड (Nanded) येथील सरकारी रुग्णालयात गेल्या 24 तासांत 12 अर्भकांसह एकूण 24 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील औषधांची कमतरता तसेच अपुरे कर्मचारी यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे डीनने सांगितले. नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाच्या डीनने नमूद केले आहे की, गेल्या 24 तासांत नोंदवलेल्या 24 मृत्यूंपैकी 12 प्रौढांचा मृत्यू प्रामुख्याने विविध आजारांमुळे झाला आहे. गेल्या 24 तासांत सहा लहान मुले व सहा लहान मुलींचा मृत्यू झाला.

डीन म्हणाले की, ‘आम्ही तृतीय स्तरावरील काळजी केंद्र आहोत आणि 70 ते 80 किमीच्या परिघात असे एकमेव ठिकाण आहे. त्यामुळे, दूरच्या ठिकाणाहून रुग्ण आमच्याकडे येतात. गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्या वाढली आणि इथल्या सुविधांच्या कमतरतेमुळे समस्या निर्माण झाल्या.’ डीनने पुढे सांगितले की, ते हॅफकिन संस्थेकडून औषधे खरेदी करणार होते, पण तसे झाले नाही. त्यांनी स्थानिक पातळीवर औषधे विकत घेतली आणि रुग्णांना दिली.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सांगितले की, रुग्णालयातील घटनेची अधिक माहिती तपासली जाईल आणि योग्य उपाययोजना केल्या जातील. मात्र महाराष्ट्रातील विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. ‘ट्रिपल इंजिन सरकार’ने भाजप, एकनाथ शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार यांचा गट) प्रकरणाची जबाबदारी घेतली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. (हेही वाचा: Buldhana Road Accident: गाढ झोपेत ट्रक दहा मजूरांच्या अंगावर; ४ जणांचा चिरडून मृत्यू, तिघे गंभीर जखमी)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर सांगितले की, ‘एकूण 24 जणांचा मृत्यू झाला आहे. सत्तर अजूनही गंभीर आहेत. या ठिकाणी वैद्यकीय सुविधा आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. अनेक मशिन्स काम करत नाहीत. रुग्णालयाची क्षमता 500 आहे, मात्र इथे 1,200 रुग्ण दाखल आहेत. याबाबत मी अजित पवार यांच्याशी बोलणार आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष घालून परिस्थिती नियंत्रणात आणावी.’

घटनेवर बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे म्हणतात, ‘नांदेड मधल्या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासात १२ नवजात बालकांसह २४ जणांचा मृत्यू झाला. हे मृत्यू केवळ योगायोग नक्कीच नाहीत. या प्रत्येक मृत्यूची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. एका दिवसात एवढे मृत्यू होत असतील तर त्याचे गांभीर्य मुख्यमंत्री आणि यंत्रणेनं लक्षात घेऊन तात्काळ चौकशीचे आदेश देणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करुन राज्याच्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. याखेरीज या मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देखील मिळायला हवी.’