
जगभरामध्ये तंत्रज्ञान क्षेत्राने घेतलेला वेग काहीसा मंदावला आहे. त्याचे परिणाम या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांवर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. सहाजिकच या क्षेत्रातील कंपन्या वाढीव खर्च कमी करण्याच्या विचारात आहे. कंपन्यांच्या या विचाराचा मोठा फटका कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना बसू लागला आहे. या कंपन्या टाळेबंदी (Google Layoffs) करत आहेत. अशा कंपन्यांमध्ये गूगलचाही समावेश आहे. गूगलने नुकतेच जाहीर केले की, कंपनी मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी करणार आहे. तंत्रज्ञानावर होत असलेला खर्च कमी करण्याच्या उद्देशाने आणि कंपनीचे आर्थिक गणित ठिक करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.
गूगलकडून कर्मचाऱ्यांना मेमो
सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, गूगलचे चीफ फायनान्शिअल ऑफिसर (CFO) रुठ पोराट यांनी म्हटले आहे की, कंपनीने कर्मचाऱ्यांना अलिकडेच नवा मेमो पाठवला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी टाळेबंदी करणार असून त्याचा सर्वाधिक परिणाम गूगलच्या फायनान्स विभागावर पाहायला मिळणार आहे. दरम्यान, कंपनीच्या या धोरणाचा परिणाम जगभरातील इतर विभागातील कर्मचाऱ्यांवरही पडेल. अशियाखंड आणि यूरोप, मध्यपूर्वेतील देशांमध्ये सक्रीय असलेल्या कर्मचाऱ्यांनाही याचा फटका बसेल. भारतातील बंगळुरु, डबलिन, मॅक्सिको सिटी, अटलांटा आणि शिकागो यांसारख्या ठिकाणी सेंट्रलाईज्ड हब बनविण्याचा कंपनीचा विचार आहे.
कर्मचारी कपातीचा आकडा गुलदस्त्यात
दरम्यान, रॉयटर्सच्या हवाल्याने लाईव्हमिंटने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेल्या मेमोमध्ये म्हटले आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) मध्ये होत असलेल्या क्रांतीमुळे तंत्रज्ञान क्षेत्र मोठ्या प्रमाणावर बदलते आहे. त्यामुळे कंपनीचे धोरण आहे की, या क्रांतीचा फायदा घेऊन जगभरातील त्यांच्या ग्राहकांना अधिक विस्तारीत सेवा देऊन आणखी चांगली उत्पादने निर्माण करणे. त्यासाठी आवश्यक निर्णय आणि खर्चा कपात करण्यासाठी काही पावले उचलावी लागत आहेत. दरम्यान, गुगलने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला असला तरी, नेमकी किती कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल याबाबत मात्र कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. सीएफओने आपल्या मेमोमध्ये म्हटले आहे की, हा काळ मोठा परिवर्तनाचा आहे. कर्मचारी कपातीबद्दल आम्हाला प्रचंड दु:ख आहे.
दरम्यान, टेक सेक्टरमधील दिग्गज असलेल्या गूगलने या आधीही कर्मचारी कपात केली होती आणि भविष्यातही ती करावी लागेल असे संगेत दिले होते. यासोबतच टेस्ला, अॅप्पल आणि अॅमेझॉन यांसारख्या कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. आगामी काळाची आव्हाने पेलण्यासाठी कंपन्यांची पुनर्बांधनी करण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.