Ajit Pawar | (Photo Credit- X)

पुण्यात गिलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, एकूण 181 रुग्णांना जीबीएसचे निदान झाले आहे, तर 27 रुग्ण संशयित आहेत. आतापर्यंत आठ मृत्यूची नोंद झाली आहे, त्यापैकी चार जण जीबीएसशी संबंधित असल्याचे पुष्टी झाली आहे आणि चार संशयित आहेत. खास करून, पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील खडकवासला भागात या प्रकरणांची संख्या अधिक आहे. हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल विकार आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार प्रणाली स्वतःच्या परिधीय नसांवर आक्रमण करते.

या आजाराचे मुख्य कारण Campylobacter Jejuni या जीवाणूचे संक्रमण असल्याचे आढळले आहे. पुण्यातील अनेक पाण्याच्या नमुन्यांमध्ये या जीवाणूची उपस्थिती आढळली आहे, ज्यामुळे दूषित पाणी आणि अर्धवट शिजवलेल्या चिकनचे सेवन हे संभाव्य कारण असल्याचे संकेत मिळाले आहेत. या आजाराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना अर्धवट शिजवलेले चिकन खाण्यापासून बचाव करण्याचा सल्ला दिला आहे, कारण ते जीबीएसच्या प्रसाराचे एक कारण ठरू शकते. तसेच, पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी सुरू आहे.

पवार म्हणाले, ‘मी नुकताच विमानतळावर विभागीय आयुक्तांना भेटलो आणि आम्ही जीबीएस परिस्थितीबद्दल चर्चा केली. खडकवासला धरण परिसरात प्रादुर्भाव झाल्याचे वृत्त आले आहे. काही म्हणत आहे की, ते पाण्याच्या दूषिततेमुळे घडले तर, काहींनी त्याला चिकनच्या सेवनाशी जोडले आहे. मात्र, आढावा घेतल्यानंतर, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, सध्या तरी कोंबड्यांना मारण्याची गरज नाही.’ पवार यांनी योग्य अन्न तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, ‘डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की अन्न खाण्यापूर्वी ते पूर्णपणे शिजवून घ्यावे. जर ते कमी शिजलेले असेल तर अशा समस्या निर्माण होतात. जीबीएसची परिस्थिती मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आहे. मी लवकरच अधिकाऱ्यांना सूचना जारी करेन आणि ते एक प्रेस नोट जारी करतील. मी माध्यमांना नागरिकांमध्ये भीती पसरवू नये असे आवाहनही करतो.’ (हेही वाचा: GBS in Maharashtra: महाराष्ट्रात जीबीएस रुग्णांच्या संख्येत वाढ; 2 नवीन रुग्ण आढळले, मृत्यूंचा आकडा 8 वर)

दरम्यान, पुणे महानगरपालिकेने (PMC) कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस रुग्णांसाठी मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, सरकारी रुग्णालयांमध्ये आयसीयु खाटांची कमतरता जाणवत आहे, कारण अनेक रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत. हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेले अन्न, मांस खाल्यामुळे होतो. त्यामुळे अशाप्रकारचे अन्न टाळावे, पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन केले जात आहे.