Sharad Pawar PM Narendra Modi talk: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चा केली. तसेच, केंद्राकडून महाराष्ट्राल मदत मिळावी. कर्नाटक (Karnataka) राज्यातील आलमट्टी (Almatti Dam) धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात यावा याबबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचे वृत्त आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही नेत्यांमध्ये 10 मिनटे चर्चा झाली. राज्यातील मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती यासंदर्भात शरद पवार यांनी कालच (गुरुवार, 9 ऑगस्ट 2019) पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेतही शरद पवार यांनी केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळावी. तसेच, आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात यावा, अशी मागणी केली होती.
महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीवर शरद पवार यांनी पुणे येथे गुरुवारी (9 ऑगस्ट 2019) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले की, आपण आजवर अनेक पूर पाहिले. अपत्ती निवारण समितीसाठी राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची मला संधी मिळाली. यावर अशी स्थिती मी अनेकदा पाहिली. पण, या वेळची स्थिती अभूतपूर्व अशी आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरासोबतच जमीनीवरील मातीही मोठ्या प्रमाणावर वाहून गेली आहे. त्यामुळे या पूराचा फटका शेती आणि शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर बसणार, असेही पवार म्हणाले. महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकारने आलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत समन्वयाने तोडगा काढावा, अशा आशयाचे विधानही शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत केले होते.
दरम्यान, गेले दोन ते तीन दिवस सांगली शहरात आणि जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पाण्याने मुक्काम केला आहे. इतका की नागरिकांची दैना दैना उडाली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पूरग्रस्त ठिकाणांचा हवाई दौरा केला. त्यानंतर आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारला विनंती केली. मात्र, कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारची विनंती धुडकावून लावली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आलमट्टी धरणातून पाच लाख क्युसेक्स पाणी सोडण्याची विनंती केली होती. ज्याला कर्नाटक सरकारने नकार दर्शवला, असे लोकसत्ता डॉट कॉमने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. परिणामी आलमट्टीतून विसर्ग न झाल्याने सांगली शहरात साचलेले पुराचे पाणी अद्यापही कायम आहे. प्राप्त माहितीनुसार सांगली शहरातील 65 टक्के भाग पुराच्या पाण्याखाली अडकला आहे. आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला तर, सांगलीत साचलेले पाणी कमी होण्यास मदत होऊ शकते. (हेही वाचा, Maharahstra Monsoon 2019: पूरग्रस्तांना दिलासा; मुंबई, महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार)
प्राप्त माहितीनुसार, आलमट्टी धरणातून शुक्रवारी (9 ऑगस्ट 2019) सकाळी दहाच्या सुमारास ४ लाख ३० हजार ३५२ क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग केला जात होता. वास्तविक पाहता महाराष्ट्राने तब्बल साडेपाच लाख क्युसेक्स इकत्या पाण्याचा विसर्ग करण्याची विनंती केली होती. पण, कर्नाटक सरकारने केवळ साडेचार लाख क्युसेक्स इतक्याच पाण्याचा विसर्ग केला. म्हणजे मूळ मागणीच्या तब्बल दीड लाख क्यूसेक्स इतक्या कमी प्रमाणात. त्यामुळे अद्यापही सांगली पूरग्रस्तच आहे.