Artificial Intelligence | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

WhatsApp Scam: आर्टीफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) जसा लोकाच्या जगण्याचा अविभाज्य भाग बणत आहे. तसाच तो एक धोकाही ठरतो आहे. केरळमध्ये नुकत्याच पुढे आलेल्या एका घटनेनुसार, एआयचा वापर करुन एकाला 40,000 रुपयांना चुना लावण्यात सायबर भामटे यशस्वी झाले आहेत. त्यामुळे एआय कितीही फायद्याचे आणि मदतगार ठरत असले तरी त्याचा वापर जपूनच करावा लागणार असल्याचे पुढे आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, राधाकृष्णन हा कोझिकोडचा रहिवासी आहे, त्याला एका अनोळखी नंबरवरून व्हिडिओ फोन कॉल आला. त्याने फोन स्वीकारला. समोर त्याच्याओळखीची व्यक्ती दिसत होती. जी त्याच्या एका सहकाऱ्यासारखी दिसत होती. त्या व्यक्तीने त्याच्याशी काही क्षण गप्पाही मारल्या. त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या सामाईक मित्रांचीही नावे घेतली. मग त्याने मुद्द्याला हात घातला. आपणल्याला रुग्णालयातील उपचारांसाठी तातडीने मदत हवी आहे असे सांगून पैसे मागितले. राधाकृष्णननेही कोणताही विचार फारसा न करता त्याच्या बँक खात्यावर 40,000 रुपये पाठवून दिले. (हेही वाचा, What is Artificial Intelligence: आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजे काय? त्याचा कुठे होतो वापर)

दरम्यान, काही वेळाने त्याच व्यक्तीने 35 हजार रुपये मागितले. मात्र यावेळी राधाकृष्णन याल संशय आला. त्यामुळे त्याने उलटतपासणीसाठी त्याच्या माजी सहकाऱ्याशी फोनवरुन संपर्क साधला. तेव्हा त्याने असे कोणत्याही प्रकारचे पैसै मागितले नसल्याचे सांगितले. लगेचच त्याच्या लक्षात आले की, त्याची फसवणूक झाली आहे. त्याने पोलिसांकडे तातडीने तक्रार नोंदवली.

राधाकृष्णन याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांना लक्षात आले की, गुन्हेगाराने तक्रारदाराला दिलेले बँक तपशील महाराष्ट्रातील एका खासगी बँकेतील व्यवहाराशी जुळत होते. त्यानंतर पोलिसांनी संपर्क केल्यावर बँक अधिकाऱ्यांनी ते खाते गोठवले. केरळ पोलिसांच्या सायबर सेलनुसार, केरळमधील फसवणुकीची ही पहिलीच घटना आहे. ज्यात घोटाळेबाजांनी बनावट व्हिडिओ बनवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला. रॅकेट करणारे सोशल मीडियावरील छायाचित्रांचा वापर करून बनावट व्हिडिओ तयार करतात. त्यांना सोशल मीडियावरून कॉमन फ्रेंड्सच्या नावासारखी माहितीही मिळू शकते.