Devendra Fadnavis Mantralaya Office Vandalized | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालय (Mantralaya Building Mumbai) इमारतीत असलेले उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून एका महिलेने तोडफोड केली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या कार्यालयातच तोडफोड (Devendra Fadnavis Office Vandalized) झाल्याने पोलीस यंत्रणाच नव्हे तर अवघे प्रशासनच खडबडून जागे झाले आहे. मंत्रालय आणि त्यातही उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालय म्हटल्यावर सुक्षा नेहमीच तैनात असते. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी झाल्याशिवाय कार्यालयात कोणासच प्रवेश मिळत नाही. असे असतानाही सुरक्षा भंग झालाच कसा आणि तोडफोड करणारी सदर महिला कार्यालयात पोहोचलीच कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, कार्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी संशयित महिलेने शक्कल लढवत प्रशासनाच्या हातावर तुरी दिल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी काढून फेकली

कार्यालयात घुसुन तोडफोड करणारी व्यक्ती एक महिला आहे. तिने कार्यालयातील झाडांच्या कुंड्या फोडल्या आणि दारावरची उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची असलेली पाटीही काढून फेकली. मंत्रालय प्रशासनाने पोलिसांशी संपर्क साधत मदत मागितली. मात्र, तोवर सदर महिला आपला कार्यभार उरकून पसारही झाली. तपासाची चक्रे तातडीने फिरवत पोलिसांनी संशयित महिलेची ओळख पटविण्यास यश मिळवल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या महिलेची ओळख पटली असली तरी, ती जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे या महिलेचे नाव पोलिसांनी गुलदस्त्यात का ठवले आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (हेही वाचा, Woman Vandalized Devendra Fadnavis' Office At Mantralaya: देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड (Watch Video))

महिलेची शक्कल, प्रशासनाच्या हातावर तूरी

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रकार गुरुवारी सायंकाळी 6.45 च्या सुमारास घडला. सर्वसाधारणपणे मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट पासची गरज असते. मात्र, सदर महिलेने शक्कल लढवली. तिने मंत्रालय इमारतीत प्रवेश देणाऱ्या संबंधित यंत्रणेस आपली पर्स आत राहिल्याचे सांगितले. ज्यामुळे तिला विनापास प्रवेश मिळाला. प्रवेश मिळताच ती थेट मंत्रालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर पोहोचली. ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय आहे. आत आल्यावर महिलेने घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ती इतक्यावरच थांबली नाही तर तिने कार्यालयातील शोभेच्या झाडांच्या कुंड्या इतस्त: फेकल्या. नंतर तिने दारावरची पाटी काढली आणि ती खाली फेकली. धक्कादायक म्हणजे प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन आत आलेली ही महिला चक्क पोलिसांसमोरूनच बाहेर पडली. घडल्या प्रकारानंतर बावचळून गेलेल्या पोलीस प्रशासनाने अखेर तब्बल 18 तासांनंर महिलेची ओळख पटवली. मात्र, ती अद्यापही उघड केली नाही.

कार्यालयात तोडफोड करताना महिला (VIDEO)

दरम्यान, सदर महिलेवर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तिच्यावर नेमक्या कोणत्या कायद्यान्वये आणि कलमाखाली गुन्हा दाखल होतो याबाबत उत्सुकता आहे. दुसऱ्या बाजूला राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांचे कार्यालयच जर सुरक्षीत नसेल तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.