
India National Cricket Team vs England National Cricket Team: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सध्या एजबेस्टनमध्ये खेळला जात आहे. नाणेफेक इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने जिंकला असून, त्याने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. या सामन्यातून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. कर्णधार शुभमन गिलने बुमराहच्या कार्यभाराचे (वर्कलोड) व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. पण, बुमराहला आराम देण्याचा हा निर्णय दुसऱ्या कसोटीत टीम इंडियासाठी अडचणीचा ठरू शकतो, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. हा निर्णय भारताला कसा आणि का महागात पडू शकतो, ते आपण सविस्तरपणे पाहूया.
आधीच 0-1 ने पिछाडीवर असलेली टीम इंडिया
पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाची सुरुवात चांगली झालेली नाही. हेडिंग्ले येथे झालेल्या पहिल्या कसोटीत बुमराह संघात असूनही भारताला 5 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. त्या सामन्यात बुमराह हा एकमेव गोलंदाज होता, जो लयीत दिसला होता. आता बुमराह नसल्यामुळे संघाचा वेगवान गोलंदाजीचा मारा खूपच कमकुवत दिसत आहे. जर भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीतही पराभवाचा सामना करावा लागला, तर मालिकेत पुनरागमन करणे अत्यंत कठीण होईल. पहिल्या कसोटीत प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांना ना धावांवर नियंत्रण ठेवता आले, ना ते विकेट्स घेऊ शकले. बुमराहच्या जागी आकाशदीपला संधी देण्यात आली आहे, ज्याने आतापर्यंत फक्त 7 कसोटी सामने खेळले आहेत.
दबावात तरुण वेगवान गोलंदाजी विस्कळीत होण्याची भीती
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीमध्ये अनुभवाची उणीव स्पष्टपणे जाणवत आहे. आकाशदीपने आतापर्यंत एकूण 7 कसोटी सामने खेळले आहेत, तर प्रसिद्ध कृष्णाकडे फक्त 4 कसोटी खेळण्याचा अनुभव आहे. सिराज हा एकमेव गोलंदाज आहे, ज्याने 37 कसोटी सामने खेळले आहेत. पण सिराज सध्या लयीत नाही, तर प्रसिद्ध कृष्णाला पहिल्या कसोटीत इंग्लिश फलंदाजांनी चांगलेच लक्ष्य केले होते. अशा परिस्थितीत, दबावाखाली ही तिन्ही वेगवान गोलंदाजांची जोडी विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या क्षणी विकेट कोण मिळवून देणार?
जसप्रीत बुमराह हा असा गोलंदाज आहे, जो गरजेच्या वेळी भारतीय संघाला विकेट मिळवून देतो. आता मोठा प्रश्न असा आहे की, बुमराहच्या अनुपस्थितीत एजबेस्टनमध्ये हे काम भारतीय संघासाठी कोण करेल? पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांनी अनेक चांगल्या भागीदारी रचल्या होत्या, ज्यामुळे त्यांना चौथ्या डावात 371 धावांचे लक्ष्य सहज पूर्ण करता आले. आता जर एजबेस्टनमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली, तर टीम इंडियाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.