Truckers |

Maharashtra Transport News: ई-चालान प्रणालीला (E-challan Protest) तीव्र विरोध करत आणि राज्यभरातील माल वाहतुकीवर गंभीर परिणाम करणाऱ्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या तक्रारी मांडत महाराष्ट्रातील ट्रक चालकांनी 1 जुलै रोजी मध्यरात्रीपासून बेमुदत संप (Maharashtra Truck Strike) सुरू केला. त्यामुळे राज्यातील मालवाहतूक सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. वहातूकदार बचाव कृती संघटनेने या संपाचे आयोजन केले आहे. संघटनेचे म्हणणे आहे की ई-चलन प्रणालीअंतर्गत वाढणारे दंड आणि जबरदस्त वसुलीची पद्धत त्यांच्या व्यवसायाला तोट्याची ठरत आहे.

ट्रकचालकांनी पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत – बळजबरीने वसूल करण्यात येणाऱ्या ई-चलन दंडांची वसुली थांबवावी, 6 महिन्यांहून जुने ई-चलन रद्द करावेत, विद्यमान दंड माफ करावेत, जड वाहनांवरील ‘क्लीनर अनिवार्य’ नियम रद्द करावा आणि शहरी भागातील नो-एंट्री वेळापत्रकाचे पुनरावलोकन करावे.

या कृती समितीचे समन्वयक उदय बारगे यांनी सांगितले की संपाच्या पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला, मात्र दुपारनंतर सहभागी संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. विशेषतः मुंबईच्या कालबादेवी परिसरात 1.5 ते 2 लाख ट्रक रस्त्यावरून हटण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

या संपाला उत्तर देताना राज्य सरकारने वाहतूक आणि मोटार वाहन विभागातील अधिकाऱ्यांसह विविध ट्रान्सपोर्ट संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली 10 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती ट्रकचालकांच्या मागण्यांचे सखोल परीक्षण करून एक महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे.

याआधी 16 ते 24 जून दरम्यान झालेल्या धरणे आंदोलनानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी चर्चा करून या समितीची स्थापना करण्याचे आश्वासन दिले होते. संपामुळे राज्यातील पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारकडून तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.