Online Transaction Fraud: ऑनलाइन व्यवहार अयशस्वी प्रकरणात फसवणूक; खासगी बँकेला 4.5 कोटी रुपयांचे नुकसान, तिघांना अटक
Cyber Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

सायबर गुन्हेगारी (Cyber Crime) आर्थिक आणि बँकींग विश्वासमोरील सध्याचे सर्वात मोठे आव्हान ठरु पाहात आहे. आजवर सायबर गुन्हेगारांनी असंख्य सामान्य नागरिक, व्यवसायिक, उद्योजकांना फसविल्याचे आपण ऐकले असेल. पण आता चक्क बँकांनाही सायबर गुन्हेगार लक्ष्य करु लागले आहेत. एका खासगी बँकेसोबत (Private Bank) नुकताच हा प्रकार घडला. ज्यामुळे बँकेला तब्बल 4.5 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. सायबर क्राईम पोलिसांनी (Cyber Crime Police) या प्रकरणात गाझियाबाद येथून तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक बीटेक (IT) पदवीधर आहे. ऑनलाईन व्यवहार अयशस्वी प्रकरणात कथीत फसवणुक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, हे तिघे हस्तक असून या घोटाळ्याचा मास्टरमाईंड वेगळाच आहे. तो सध्या तुर्कीमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सायबर क्राईम पोलिसांसमोर आव्हान असलेल्या या प्रकरणाबाबत टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, हॅकरने आंतरराष्ट्रीय व्यापारी असल्याचे भासवले आणि बँकेला क्रेडिट कार्ड धारकांच्या वतीने व्यवहार केला. मात्र, हा व्यवहार अयशस्वी झाल्याचे दर्शवत त्याने बँकेकडून पैसे परत मिळवले. धक्कादायक म्हणजे बँकेकडून कोणताही व्यवहार आगोदर झाला नव्हता. त्यामुळे न झालेल्या व्यवहाराची रक्कम त्याने बँकेची फसवणूक करुन परत मिळवली. आपल्या फसव्या दाव्यांची पुष्टी करण्यासाठी बनावट खरेदी रिव्हर्सल दस्तऐवज बँकेला जमा करून, हॅकरने जून ते डिसेंबर 2023 दरम्यान सुमारे 4.5 कोटी रुपये 34 क्रेडिट कार्डधारकांना हस्तांतरित करण्यास बँकेला प्रवृत्त केले. (हेही वाचा, Online Classes Fraud: 'ऑनलाइन क्लासेसच्या नावाखाली 64 लाख रुपयांचा गंडा)

दरम्यान, आपल्या आर्थिक व्यवहारांचा ताळेबंद पाहताना जमा झालेल्या रकमेची उकल होत नसल्याचे बँकेच्या लक्षात आले. त्यामुळे बँकेच्या उपाध्यक्षांनी जानेवारीमध्ये पोलिस तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राप्त माहितीनुसार फसवणूक आणि तोतयागिरी केल्याबद्दल एफआयआर नोंदवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांनी' बँकेशी संपर्क सुरू केला आणि अनेक ग्राहकांचे व्यवहार अयशस्वी झाल्याचा आरोप केला. त्यानंतर, त्यांनी नंतरच्या तारखेला परतफेड करण्याचे आश्वासन देऊन, निवडक ग्राहकांच्या क्रेडिट कार्डवर रक्कम परत करण्यास बँकेला भाग पाडले. तथापि, व्यापाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही बँक आपली क्रेडिट रक्कम वसूल करण्यात अयशस्वी ठरल्याने, एफआयआर दाखल करण्यात आला. (हेही वाचा, Cybersecurity for Gadgets: सायबर सुरक्षा वापरून तुमचे गॅझेट ठेवा हॅकिंगपासून दूर; खास टीप्स)

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी मनी ट्रेलची छाननी केल्यावर असे आढळले की बँकेने अंधेरीचे रहिवासी मुझम्मिल वारसी यांना 76 लाख रुपये जमा केले होते. ज्याने गाझियाबाद येथील बीटेक (आयटी) पदवीधर रामकुमार यादव यांना 45 लाख रुपये हस्तांतरित केले होते. यादवने कमिशन म्हणून काही भाग राखून ठेवला आणि उर्वरित निधीचे क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतर केले, जे नंतर हॅकरला पाठवले गेले. त्याचप्रमाणे, मुंब्रा येथील शेअर व्यापारी अरबाज रौला यांना त्यांच्या क्रेडिट कार्डमध्ये अंदाजे रु. 1.8 लाख मिळाले, ज्यातील उर्वरित रक्कम टेलिग्रामद्वारे दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्यापूर्वी त्यांनी 20% कमिशन राखून ठेवले. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.