Cyber Crime News Pune: पुण्यात बोकाळले सायबर भामटे, आठ महिन्यांत 20 कोटींहून अधिक रकमेवर डल्ला
Cyber Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Cyber Police Pune News: सायबर क्राईम हा 'डिजिटल इंडिया'पुढे (Digital India vs. Cybercrime) सर्वात मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे. याची चूणुक पुणे शहरात पाहायला मिळते. नुकत्याच पुढे आलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पुढे आले आहे. केवळ 8 महिन्यांच्या कालावधीमध्ये एकट्या पुणे शहरात ऑनलाईन फ्रॉड संदर्भात तब्बल 1114 गुन्हे नोंदवले गेले असून पुणेकरांची तब्बल 20 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाली आहे. ही केवळ तक्रार प्राप्त होऊन नोंदल्या गेलेल्या गुन्ह्यांची संख्या आहे. दाखल न झालेल्या गुन्ह्यांचा आकडा त्याहीपेक्षा कितीतरी अधिक असल्याचे पाहायला मिळू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार जानेवारी 2023 ते 31 ऑगस्ट या आठ महिन्यात पुणे सायबर पोलीस स्टेशन येथे तब्बल 1114 गुन्हे दाखल झाले. दाखल झालेल्या गुन्ह्यांचे स्वरुप पाहिले तर ते प्रामुख्याने एखाद्या अॅपच्या माध्यमातून कर्ज घेणे, नोकरीचे आमिष दाखवणे, शेअर मार्केट, बिल भरणे, ऑनलाईन खरेदीवर सूट, अधिक पैसै मिळवून देण्याचा बहाणा, पैसे दुप्पट करण्याची योजना, नातेवाईक, आप्तेष्ठ यांचे फोटो मॉर्फ करुन त्यावर घाणेरडा मजकूर लिहून ब्लॅकमेलींग यांप्रकारचे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्ह्यांचे वर्गीकरण आणि त्यांची संख्या पुढील प्रमाणे. ही संख्या केवळ जानेवारी 2023 ते 31 ऑगस्ट या कालावधीतल आहे. मनी ट्रान्स्फर: 56, केवायसी अपडेट: 42, क्रिप्टोकरन्सी: 58, इन्शुरन्स फसवणूक: 10,जॉब फसवणूक: 31, शेअर मार्केट फ्रॉड: 27, लोन फ्रॉड: 29, ऑनलाईन सेल आणि परचेस फ्रॉड: 62, फेक प्रोफाईल: 85, फेसबुक हॅकिंग: 34, सेक्सटॉर्शन: 35

सायबर क्राईम ही गुन्हेगारी कृती आहे. जी एकतर संगणक, संगणक नेटवर्क किंवा नेटवर्क केलेले उपकरण लक्ष्य करते किंवा वापरते. बहुतेक सायबर गुन्हे हे सायबर गुन्हेगार किंवा पैसे कमवू इच्छिणारे हॅकर्स करतात. तथापि, अधूनमधून सायबर गुन्ह्यांमध्ये नफ्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी संगणक किंवा नेटवर्कचे नुकसान करण्याचा हेतू असतो. हे राजकीय किंवा वैयक्तिक असू शकतात. सायबर गुन्हे व्यक्ती किंवा संस्थांद्वारे केले जाऊ शकतात. काही सायबर गुन्हेगार संघटित आहेत, प्रगत तंत्र वापरतात आणि अत्यंत तांत्रिकदृष्ट्या कुशल असतात. इतर नवशिक्या हॅकर्स आहेत.