Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातील गुन्हेगारीबाबत (Crimes in Maharashtra) एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी खुनाच्या गुन्ह्यांच्या नोंदीमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होता. एनसीआरबीनुसार, गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात 3717 हत्येचे गुन्हे दाखल झाले होते, त्यानंतर बिहार (2799) आणि महाराष्ट्र (2330) होते. हत्येमागील कारणांचा खुलासा करताना, एनसीआरबीच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, 2330 प्रकरणांपैकी 1027 हत्या विविध विवादांमुळे घडल्या, ज्यात मालमत्ता विवाद, कौटुंबिक वाद, किरकोळ भांडणे, पैशाचा वाद आणि पाण्याचा वाद यांचा समावेश आहे.

मुंबईत दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्यांच्या विश्लेषणात, मुंबईत 63 गुन्हे वेगवेगळ्या प्रकारच्या वादांशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. 24 प्रकरणे वैयक्तिक सूड किंवा शत्रुत्वाशी संबंधित होती, 10 प्रकरणे वैयक्तिक फायद्यासाठी केलेल्या खुनाशी संबंधित आहेत, 8 प्रकरणे प्रेमप्रकरणाशी संबंधित, 6 प्रकरणे दरोडेखोरीशी संबंधित आहेत आणि अवैध संबंधांशी संबंधित 3 प्रकरणे होती.

माजी आयपीएस अधिकारी वायपी सिंग म्हणतात, ‘महाराष्ट्रात अंडरवर्ल्ड जवळजवळ संपले आहे त्यामुळे राज्यात बहुसंख्य खुनाच्या घटना सामान्यतः कौटुंबिक वादामुळे होतात. व्यावसायिक खून महाराष्ट्रात फारच कमी आहेत.’ गेल्या वर्षी नोंदवलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यांच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक (14554) प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यानंतर महाराष्ट्र (10502) आणि बिहार (10198) आहेत.

दुसरीकडे, तेलंगणानंतर महाराष्ट्रात गेल्या वर्षी मानवी तस्करीची सर्वाधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत, गेल्या वर्षी एकूण 880 महिला आणि 10 पुरुषांची मानवी तस्करीतून सुटका करण्यात आली होती. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी देशभरात मानवी तस्करीचे एकूण 2,189 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी तेलंगणामध्ये 347, महाराष्ट्रात 320, आसाममध्ये 203 आणि केरळमध्ये 201 प्रकरणे नोंदवली गेली. (हेही वाचा: Pune: पुण्यात अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग करणारा सरकारी शाळेतील शिक्षक अटकेत)

महाराष्ट्रातील मानवी तस्करीच्या परिस्थितीचा विचार करता, एकूण 918 पिडीत लोकांपैकी 858 महिला होत्या. महाराष्ट्रात गेल्या वर्षी सुटका करण्यात आलेल्या पिडीत लोकांची संख्या दहा पुरुषांसह 890 होती. पुढील विश्लेषणातून असे दिसून आले की, बचावलेल्या पीडितांपैकी 856 जणांची वेश्याव्यवसायासाठी, 16 जणांची सक्तीने मजुरी करण्यासाठी आणि तीन जणांची जबरदस्तीने लग्न करण्यासाठी तस्करी झाली.