गेल्या 15 दिवसांत महाराष्ट्रात कोविड-19 (Maharashtra Covid-19) प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ झालेली दिसून येत नसल्यामुळे, राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यामुळे साथीच्या रोग एंडेमिक स्टेजला पोहोचला असू शकतो आणि संसर्ग एक हंगामी गोष्ट बनू शकते. गेल्या आठवड्यात डिसेंबरमध्ये, जेव्हा चीनमध्ये कोविड-19 प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली होती, तेव्हा भारतातही संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे याआधी देशात सर्वात जास्त केसलोड असलेल्या व साथीच्या रोगाचा केंद्रबिंदू ठरलेल्या महाराष्ट्राला हाय अलर्टवर ठेवण्यात आले होते.
परंतु 19 डिसेंबर 2022 ते 3 जानेवारी या कालावधीतील गेल्या 15 दिवसांच्या आकडेवारीनुसार राज्यात केवळ 1,574 प्रकरणे आणि 13 मृत्यूची नोंद झाली आहे. चाचणी सकारात्मकता दर (टीपीआर)- घेण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या व त्यातून सकारात्मक प्रकरणांचे गुणोत्तर 0.05 टक्क्यांपेक्षा कमी आहे, जे गेल्या जानेवारीत 12 टक्के होते.
याबाबत अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले की, ‘महाराष्ट्रात दररोज सरासरी 20 ते 30 प्रकरणांची नोंद होत आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणावर संसर्गाचे प्रमाण कमी होते तेव्हा ही गोष्ट स्थानिक पातळीवरील रोगाकडे वळण्याचे संकेत देते. आमचा विश्वास आहे की, कोविड-19 देखील इतर हंगामी संक्रमणांप्रमाणेच एक होईल, जो ऋतूतील फरकांवर अवलंबून असेल. जसे आम्ही स्वाईन फ्लूसारख्या प्रकरणांमध्ये वाढ आणि घट पाहू शकतो, असेच कोविड-19 चे होईल.’
चीनमध्ये कोविड-19 च्या वाढीमुळे व BF.7 ओमिक्रॉन सब-व्हेरियंटमुळे, भारत सरकार सर्व कोविड-19 पॉझिटिव्ह नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवत आहे. मात्र, महाराष्ट्रात आतापर्यंत या प्रकाराचे कोणतेही प्रकरण नोंदवले गेले नाही. भविष्यात, महाराष्ट्रात रुग्णांमध्ये वाढ होईल का?, असे विचारले असता आवटे म्हणाले, ‘राज्यातील संसर्ग दरामुळे– आधीच 81 लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे– संसर्गाची तीव्रता कमी असेल. चीनमध्ये, कठोर नियमांमुळे, बऱ्याच लोकांना संसर्ग झाला नाही परंतु नंतर निर्बंध हटवण्यात आले तेव्हा त्यांना विषाणूचा संसर्ग झाला.’ (हेही वाचा: महाराष्ट्र गारठला! राज्यात निच्चांकी तापमानची नोंद, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज)
ते पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्रात किंवा भारतातही, संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याने इथे हर्ड इम्युनिटी प्राप्त झाली आहे. त्यामुळे चीनसारखा आणखी एक उद्रेक होण्याची शक्यता कमी आहे.’ हॉस्पिटलमधील एस एल रहेजा हॉस्पिटलमधील क्रिटिकल केअरचे प्रमुख डॉ. संजीथ ससेधरन म्हणाले- ‘भारत कोविड-19 वर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवू शकला आहे कारण लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले आहे आणि त्यांना अनेक वेळा संसर्ग झाला आहे, ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढली आहे. त्यामुळे भारतात आणखी एक लाट येण्याची शक्यता कमी होईल.’