Mucormycosis: म्युकर मायकोसिस उपचारांवरील खासगी रुग्णालयांच्या मनमानीला राज्य सरकारचा चाप; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अधिसूचनेस मंजूरी
Uddhav Thackeray | (File Photo)

राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या म्युकरमायकोसिस (Mucormycosis) रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन राज्य सरकार सतर्क झाले आहे. म्युकरमायकोसिस आजारावरील उपचारासाठी येणारा खर्च प्रचंड असतो. त्यात खासगी रुग्णालयं या आजारावरील उपचारांसाठी प्रचंड मनामानी करतात. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड बिल येते. राज्य सरकारने खासगी रुग्णालयांकडून करण्यात येणाऱ्या मनमानीला चाप लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले टाकली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला नुकतीच मंजूरी दिली.या अधिसूचनेनुसार म्युकरमायकोसिस आजारावरील उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. दरनिश्चिती करण्यासाठी शहरांचे वर्गीकरण करण्यात आले आहेत. निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत.

म्युकरमायकोसिस आजारावर करण्यात येणारे उपचार हे राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने आधीच जाहीर केले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही घोषणा केली होती. त्यानुसार आतापर्यंत अनेक रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. सध्याही महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अनेक रुग्ण म्युकरमायकोसिस आजारांवर मोफत उपचार घेत आहेत. (हेही वाचा,Mucormycosis संसर्गापासून बचावासाठी मधूमेह नियंत्रण आणि दातांची स्वच्छता आवश्यक )

दरम्यान, खासगी रुग्णालयं म्यूकर मायकोसिस रुग्णांवर उपचार करताना मनमानी दर आकारत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल गांभीर्याने घेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारकडे एक प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावात म्हटले होते की, म्यूकर मायकोसिस आजारावर उपचार करणाऱ्या राज्यातील खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित करण्यात यावेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावावरील अधिसूचनेस मान्यता दिली आहे. त्यानुसार ही अधिकसूचना 31 जूले 2021 अखेरपर्यंत लागू राहणार आहे.

म्यूकर मायकोसीस उपचारांवरील निश्चित दर

वॉर्डमधील अलगीकरण:

 • अ वर्ग शहरांसाठी 4000 रुपये
 • ब वर्ग शहरांसाठी 3000 रुपये
 • क वर्ग शहरांसाठी 2400 रुपये

वरील दरपत्राकांमध्ये रुग्णाची देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च व जेवण यांचा समावेश आहे. मात्र, मोठ्या चाचण्या व तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळण्यात आली आहेत.

व्हेंटिलेटरशिवाय आयसीयू व विलगीकरण:

 • अ वर्ग शहरांसाठी 7500रुपये
 • ब वर्ग शहरांसाठी 2500 रुपये
 • क वर्ग शहरांसाठी4500 रुपये

व्हेंटिलेटरसह आयसीयू व विलगीकरण:

 • अ वर्ग शहरांसाठी 9000 रुपये
 • ब वर्ग शहरांसाठी 6700 रुपये
 • क वर्ग शहरांसाठी 5400 रुपये

 1. अ वर्ग शहरांत मुंबई तसेच महानगर क्षेत्र ( मीरा भाईंदर मनपा, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर मनपा क्षेत्र, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर,पनवेल महापालिका), पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर ( नागपूर मनपा, दिगडोह, वाडी) यांचा समावेश आहे.
 2. ब वर्ग शहरांमध्ये नाशिक, अमरावती, औरंगाबाद, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली यांच्यासह सर्व जिल्हा मुख्यालये यांचा समावेश आहे
 3. क वर्ग गटात अ आणि ब गटाव्यतिरिक्त इतर शहरे यांचा समावेश करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे म्युकरमायकोसिस आजारात शस्त्रक्रिया हा उपचारातील महत्वाचा घटक लक्षात घेऊन राज्य शासनाने 28 प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठीचा खर्च निश्चित केला असून अ वर्ग शहरांमध्ये त्यासाठी 1 लाख रुपयांपासून ते 10 हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी 75 हजार रुपयांपासून ते 7500 रुपयांपर्यंत आणि क वर्गातील शहरांसाठी ६० हजार रुपयांपासून ते ६००० रुपयांपर्यंत दर ठरवून दिले आहेत.