Mucormycosis संसर्गापासून बचावासाठी मधूमेह नियंत्रण आणि दातांची स्वच्छता आवश्यक
Black fungus (Photo Credits-Facebook)

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मधुमेह आणि स्टिरॉईडसचा अति प्रमाणात वापर यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य संसर्गाची लागण होण्याची शक्यता अधिक असते, अशी माहिती केरळ भारतीय वैद्यकीय परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी दिली. डॉ राजीव जयदेवन आणि दंतचिकित्सक डॉ. नीता यांनी पत्र सूचना कार्यलायाने आयोजित केलेल्या 'कोविड-19, म्युकरमायकोसिस आणि दातांची स्वच्छता' या विषयावरील वेबिनारमध्ये मार्गदर्शन केले.

म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य संसर्गाविषयी माहिती देताना डॉ. राजीव जयदेवन म्हणाले की, पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात या संसर्गाची लागण जास्त दिसून येते, कारण आपल्याकडे स्व-उपचारावर अजूनही जास्त भर दिला जातो. कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मधुमेह रुग्णांनी नियमित रक्तशर्करा तपासावी तसेच स्टिरॉईडसचा वापर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. रक्तातील साखर वाढल्यास रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. ज्यामुळे न्युट्रोफिलसारख्या पांढऱ्या पेशींवर परिणाम होतो. कोविड रुग्णांच्या तुलनेत म्युकरमायसोसिस रुग्णांचे प्रमाण अगदीच नगण्य असल्याचे ते म्हणाले.

बुरशी गोड पदार्थ आणि जस्तावर लवकर वाढते. बुरशी आपल्या पेशींवर हल्ला करते. त्यामुळे पेशी मृत होतात, त्यावेळी त्यांचा रंग काळा होतो. यामुळे याला काळी बुरशी असे साधारणपणे म्हटले जाते. मात्र, कोणत्याही रंगावरुन याला नाव देण्यापेक्षा म्युकरमायकोसिस असेच संबोधणे योग्य असल्याचे डॉ राजीव म्हणाले.

कोविड संक्रमणात लक्षणविरहीत रुग्णांनी औषधोपचार टाळावा. योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि अगदीच आवश्यकता भासल्यास पॅरासिटीमलचा वापर करावा, अशी माहिती डॉ राजीव यांनी दिली. स्व-उपचार हे म्युकरमायसोसिसला आमंत्रण आहे, असे ते म्हणाले. मात्र, 5-6 दिवसानंतर जर लक्षणांमध्ये वाढ झाली, जसे थकवा जाणवणे, श्वसनास त्रास होणे, जेवणाची इच्छा न होणे, छातीत दुखणे किंवा अस्वस्थ वाटणे तर तुम्ही रुग्णालयात जावे किंवा डॉक्टरांशी दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क करावा.