Coronavirus: Swab Sample गोळा करताना अवघे 30 ते 40 सेकंद लागत असले तरी 'हे' प्रचंड जोखमीचं काम! महाराष्ट्रातील कोविड वॉरिअरने शेअर केलेला अनुभव वाचा
COVID19 Warriors Swab Sample (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) देशभरात थैमान घातले असताना अनेक कोविड वॉरियर्स (COVID Warriors) अहोरात्र मेहनत करून रुग्णांवर उपचार करत आहेत, साहजिकच यावेळी त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. महाराष्ट्रातील कोरोनाव्हायरस रुग्णांच्या उपचारासाठी काम करणाऱ्या एका डॉक्टरने संशयित रूग्णांचे स्वॅप नमुने (Swab Sample) गोळा करण्याचे कठीण काम व त्यावेळी येणारी आव्हाने याविषयी आपला अनुभव शेअर केला आहे. एखाद्या व्यक्तीच्या स्वॅब नमुना संकलनाची प्रक्रिया 30 ते 40 सेकंदांपेक्षा जास्त वेळ घेणार नाही, परंतु ही कमी अवधीची प्रक्रिया सुद्धा अत्यंत जोखमीची आहे असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयातील डॉ. पुष्कर दाहिवाल (Dr. Pushkar Dahiwal) यांनी याविषयी पीटीआयला माहिती दिली आहे. या हॉस्पिटल मध्ये दिवसाला 80 ते 100 स्वॅब नमुने गोळा करून चाचण्या केल्या जातात. कोरोनाचे लेटेस्ट अपडेट्स जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा.

डॉ. पुष्कर दाहिवाल यांनी सांगितल्यानुसार, “सर्व डॉक्टर सलग तीन दिवस काम करतात आणि त्यानंतर 14 दिवस स्वत: ला विलगीकरणात ठेवतात” सहा तासाच्या ड्युटी दरम्यान डॉक्टरांना वैयक्तिक संरक्षक उपकरणे (PPE) परिधान करावी लागतात आणि काम इतके त्वरित होते की पाणी पिण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही, स्वाब नमुने देण्यासाठी येणारी मंडळी ही अन्य रुग्णांच्या संपर्कात येऊ नयेत यासाठी हे काम अत्यंत चपळाईने करणे आवश्यक असते. यावेळी स्वतःलाच या व्हायरसची बाधा जपू न देण्यासाठी स्वसंरक्षण करणे हे सुद्धा आव्हान असते. "

स्वाब नमुना घेण्यासाठी वापरात असलेल्या उपकरणांविषयी सांगताना डॉ. दहिवाल सांगतात की, "10 ते 12 सें.मी. एक लांब स्टिक स्वाब नमुना घेत असताना त्या रुग्णाच्या गळ्यात व नाकात टाकायची असते, नाकात घालायची ही स्टिक तुलनेने अधिक लांब व पातळ असते. अशावेळी त्या रुग्णाला खोकला किंवा शिंक येऊ शकते. त्याआधीच हा नमुना बाहेर काढणे आवश्यक असते. जर का हा स्वॅबचा नमुना पडला तर मोठा अनर्थ होऊ शकतो या सर्व गोष्टी अगदी थोड्या कालावधीत पूर्ण कराव्या लागतील. त्यामुळे चूक होण्यास वाव ठेवताच शक्य होत नाही".

"काही लोकांना ही चाचणी नेहमीपेक्षा वेगळी आणि धोकादायक वाटते त्यामुळे ही मंडळी अगोदरच घाबरलेली असतात. परंतु, आम्ही त्यांना त्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण देतो जेणेकरुन भीती निघून जाते, अशीच काही मंडळी संसर्ग नसतानाही भीती बाळगून असतात तर काही जण आपल्याला संसर्ग झालाच नाही असा अतिविश्वास घेऊन वावरतात. हे दोन्ही विचार योग्य नाहीत त्यामुळे संबंधित व्यक्तींचे समुपदेशन करणे आवश्यक आहे.

दरम्यान, डॉ. दहीवाल यांनी 2008 मध्ये मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये झालेल्या 26 /11 च्या दहशतवादी हल्ल्यातील जखमींवर उपचार केले होते. याचीच आठवण सांगताना "हल्ला सुरू होण्याच्या 20 मिनिटांपूर्वीच मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोडले. त्यावेळी हल्लेखोर कुठल्याही बाजूने येऊ शकतात याची आम्हाला भीती होती. प्रत्येक वेळी जेव्हा मी संशयित कोरोनाव्हायरसचे स्वॅप नमुने गोळा करतो तेव्हा ही घटना माझ्या मनात येत असते" असे दहिवाल यांनी म्हंटले आहे.