हातावर पोट असलेला ‘भारत’ उद्रेकाच्या स्थितीत आहे. ‘इंडिया’ नावाचा देश कोरोनाच्या विरोधात थाळ्या वाजवत दिवे पेटवत असेल, पण ‘भारत’ मात्र पोटातील आगीवर पाणी कसे मारता येईल या विवंचनेत आहे, असा टोला लगावतानाच मुंबई येथे वांद्रे परिसरात जमलेली गर्दी ही षडयंत्र असल्याची घणाघाती टीका शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र अशी ओळख असलेल्या दै. सामना संपादकियतून (Saamana Editorial) करण्यात आली आहे. सामना संपादकीयच्या माध्यमातून शिवेसनेने काही प्रश्न उपस्थित केले असून सुरत येथे परप्रांतीय मजुरांचा जो उद्रेक झाला त्याचा साधा उल्लेखही होत नाही. हा काय प्रकार म्हणायचा? अशी विचारणा केली आहे. 'चलो अपने गांव! त्यांना खिळा ठोका' या मथळ्याखाली लिहीलेल्या लेखात वांद्रे घटनेवर बरेच विस्ताराने लिहिले आहे.
सामना संपादकीयातील महत्त्वाचे मुद्दे
आम्ही या षड्यंत्राचा मुखवटा ओढून काढू
मुंबईतून परराज्यांमध्ये जाणाऱ्या गाड्या फक्त वांद्रय़ावरूनच सुटत नाहीत. त्या लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा रेल्वे स्थानकांवरूनही सुटतात. पुणे, नागपुरातूनही सुटतात; पण गर्दी जमा केली गेली ती फक्त वांद्रे स्थानकाजवळ. काही (हिंदी) वृत्तवाहिन्यांवरही फक्त वांद्रे येथील मंगळवारच्या गर्दीवरच चर्चेची गुऱ्हाळे चालवली गेली. या गुऱ्हाळांमध्ये सुरत येथे परप्रांतीय मजुरांचा जो उद्रेक झाला त्याचा साधा उल्लेखही होत नाही. हे मोठे षड्यंत्र आहे. त्यामागचे गौडबंगाल लोकांना समजले. पण आम्ही या षड्यंत्राचा मुखवटा ओढून काढू. कोरोना संकटाची संधी साधून कोणी राजशकट खिळखिळे करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याच्या कपाळावर सरकारला खिळा ठोकावा लागेल. विरोधी पक्षाने इतक्या खाली घसरावे याचे आम्हाला दुःख होत आहे. (हेही वाचा, समाजमाध्यमांवर तेढ निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात आतापर्यंत 201 गुन्हे दाखल तर 37 जणांना अटक- अनिल देशमुख)
फडणवीस रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागणार आहेत काय?
मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकावर मंगळवारी संध्याकाळी अचानक हजारो परप्रांतीय मजूर जमले आणि त्यांनी धिंगाणा घातला. आपापल्या राज्यांत जाण्यासाठी रेल्वेतर्फे विशेष गाड्या सोडणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली आणि लगेच ही गर्दी उसळली. गाडय़ा सोडण्याबाबत ‘अफवा’ पसरली असे आम्ही सांगत नाही. ती बातमीच आहे. कारण अशा गाड्या सोडण्याबाबतचे रेल्वेचे एक परिपत्रकच समोर आले आहे. म्हणजे अफवा उठली आणि लोकांनी गर्दी केली असे म्हणता येत नाही. दुसरे असे की, 15 एप्रिलनंतरच्या तारखांसाठी रेल्वेने रिझर्व्हेशन कसे घेतले? पंतप्रधान ‘लॉक डाऊन’ उठवणार की आणखी काही करणार याबाबत संभ्रम असताना रेल्वे 40 लाख लोकांचे रिझर्व्हेशन घेऊन गोंधळ उडवते हा अपराध आहे. त्यामुळे वांद्रय़ात जी गर्दी उसळली, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्यास रेल्वे मंत्रालय जबाबदार आहे व त्याबद्दल महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागणार आहेत काय?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.
नेत्यांच्या भाषणांनी पोट भरत नाही
14 एप्रिल रोजी सकाळी देशाचे लोकप्रिय आणि कार्यक्षम पंतप्रधान मोदी हे ‘बंद’चा कालावधी वाढवल्याची घोषणा करतात, जनतेने 3 मेपर्यंत घरातच थांबावे असे आवाहन करतात आणि मोदींचे भाषण संपताच मुंबई, सुरतसह अनेक शहरांतील मजूरवर्ग रस्त्यावर उतरतो हे भयंकर आहे. म्हणजेच नेत्यांच्या भाषणांनी पोट भरत नाही व सरकारी मदतीवर लोक संपूर्णतः खूश नाहीत. त्यांचा जगण्या-मरण्याचा संघर्ष वेगळा आहे. हातावर पोट असलेला ‘भारत’ उद्रेकाच्या स्थितीत आहे. ‘इंडिया’ नावाचा देश कोरोनाच्या विरोधात थाळ्या वाजवत दिवे पेटवत असेल, पण ‘भारत’ मात्र पोटातील आगीवर पाणी कसे मारता येईल या विवंचनेत आहे. ही विवंचना आज सगळय़ाच क्षेत्रांत आहे. लहान-थोर आणि गरीब-श्रीमंतांनादेखील ती भेडसावत आहे. सगळय़ांचेच बारा वाजले आहेत. पण गरीबांच्या संदर्भात सरकारला वेगळी भूमिका घ्यावी लागेल.
दरम्यान, मुंबईसारखी शहरे ‘बंद’ पडतात तेव्हा देशाचे पोट उपाशी राहते याचा अनुभव सध्या येत आहे. देशाचा आर्थिक डोलारा कोसळतो आहे. अर्थात, पैशाचे सोंग आणता येत नाही हेसुद्धा तितकेच खरे. अशा परिस्थितीत राज्य चालवणे जिकिरीचे काम आहे. म्हणून कालपर्यंत ज्याने पोटापाण्याची व्यवस्था केली ते राज्य सोडून पळून जाणे ही बेईमानी आहे. जे संकटकाळात येथे राहिले तेच महाराष्ट्राचे भूमिपुत्र. जे गोंधळ घालून पळून जात आहेत ते पुन्हा येथे येणार नाहीत याची तजवीज प्रशासनाने आता केलीच पाहिजे, असंही सामना संपादकीयमध्ये म्हटलं आहे.