Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजार, महागाई, उद्योग आणि अर्थव्यवस्थेवर होणार मोठा परिणाम
Coronavirus Effect On Indian Economy | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) हा केवळ जगभरातील देश आणि मानवी समाजासाठीच नव्हे तर अर्थव्यवस्थेसाठीही घातक ठरत आहे. अनेक देशांमधील जल, हवाई आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. अपवादात्मक स्थितीतच ही वाहतूक करण्यात येत आहे. तसेच देशांतर्गत दळनवळण आणि व्यवहारांवरही मर्यादा आल्या आहेत. ज्याचा परिणाम त्या त्या देशाची आणि पुढे जाऊन जागतीक अर्थव्यवस्था (Global Economy ) अडचणीत येण्यासाठी होऊ शकतो. शेअर बाजार (Stock Market), महागाई (Inflection), जगभराचा विचार करता आतापर्यंत जगभरात सुमारे 128,827 लोक कोरोना व्हायरसमुळे संक्रमीत झाले आहेत. तर 113 देशांमधील सुमारे 4600 पेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही आतापर्यंत 2 व्यक्तींचा कोरोना व्हायरसने बळी घेतला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरही कोरोना व्हायरसचा मोठा प्रभाव पडेल असे दिसते.

व्यायामशाळा, सिनेमागृहांवर बंदी

भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 80 इतकी झाल्याची माहिती आहे. या आकड्यात थोड्याफार प्रमाणात बदल असू शकतो. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, राजस्थान, बिहार आणि महाराष्ट्रातील काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात सिनेमागृह, तरणतलाव आणि व्यायामशाळा बंद ठेवण्याचे आदेश आहेत. शाळा, सिनेमागृह, तरणतलाव आणि व्यायामशाळा यांचेही एक आर्थिक गणीत असते. वरवर पाहता या गोष्टी तितक्या मोठ्या वाटल्या नाही तरी, अर्थव्यवस्थेत त्यांचे मोठे योगदान असते.

चित्रपट व्यवसायावर मोठा परिणाम

कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्याचा एक उपाय म्हणून गर्दी टाळण्यावर भर दिला जात आहे. या पर्यायाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात आणि देशातील विविध ठिकाणी होणारे अनेक चित्रपटांचे शुटींगही रद्द करण्यात आले आहे. एका बाजूला चित्रपटगृहांवर बंदी त्यामुळे नव्याने प्रदर्शित होणारे चित्रपट लांबणीवर पडले आहेत. तर दुसऱ्या बाजूला चित्रपटांचे शूटींगही रद्द झाले आहे. एकेका चित्रपटांवर हजारो, कोटी रुपये लावण्यात आलेले असतात. चित्रपट व्यवसायाचे स्वत:चे म्हणून असे अर्थव्यवस्थेत वेगळे स्थान आहे. त्यामुळे या व्यवसायावर मंदी आल्यास आर्थिक क्षेत्रालाही त्याचा मोठा फटका बसतो.

मॉल बंद

कोरोना व्हायरचा प्रभाव ओसरेपर्यंत काही काळ मॉलही बंद ठेवण्यात येणार आहेत. एकेका मॉलची कोट्यवधी रुपयांची उलाढाल असते. अशा वेळी हे मॉल ठरावीक काळासाठी बंद राहणे म्हणजे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान असते. कारण बाजारात चलनक्रयच होत नाही आणि व्यवहार ठप्प राहतात. त्यामुळे मालांचा उठाव होत नाही. परिणामी उत्पदन करण्यावर मर्यादा येते. ज्याचा परिणाम कामगारांवर होतो. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरस जागतिक अर्थव्यवस्थेवर करतोय नकारात्मक परिणाम?)

आयपीएस, क्रीडा स्पर्धा, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी

आयपीएल, क्रीडा स्पर्धा, सार्वजनिक कार्यक्रम आदींवरही बंदी घालण्यात आली आहे. आयपीएलीच तिकीट विक्रीट थांबविण्यात आली आहे. या स्पर्धा तसेच, धार्मिक कार्यक्रम (यात्रा, जत्रा, उरुस) हे सुद्धा अर्थव्यवस्थेत महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. आयपीएलची मोठी उलाढाल असते. तर, ग्रामिण भागातील अर्थिव्यवस्थेत जत्रा, यात्रांचे मोठे योगदान असते.

घरुन काम अथवा कंपन्या बंद

अधिक मोठ्या प्रमाणावर कर्मचारी असलेल्या काही आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. तर काही कंपन्या काही काळासाठी काम बंद ठेवण्याचा विचार करत आहेत. या सर्वांचाही उत्पादन आणि वितरण यावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे सहाजिकच अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो.

देशादेशांमधील वाहतूक ठप्प

आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये विमान आणि जहाज वाहतुकीचे महत्त्व मोठे आहे. अशा स्थितीत कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांनी एकमेकांमध्ये होत असलेली हवाई आणि जलमार्गे वाहतूक बंद ठेवली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्येही मोठा परिणाम होताना दिसत आहे. अनेक देशांतील पर्यटन व्यवसाय बुडाला आहे. त्याचसोबत व्यापार आणि गुंतवणुकीवरही परिणाम झाला आहे.

शेअर बाजार कोसळला

शेअर बाजारातील तज्ज्ञ सांगतात की, कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजारावरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे तो वारंवार कोसळत आहे. याचा परिणाम येत्या काळात महागाई वाढण्यात आणि बेरोजगारी वाढण्यातही होऊ शकतो. ज्यामुळे देशाची आणि जगाचीही अर्थ्यव्यवस्था अडचणीत येऊ शकते.

आज घडीला कोरोना व्हायरसमुळे भारताचे जगभरातील इतर देशांचे आणि पर्यायाने जागतिक अर्थव्यवस्थेचे किती नुकसान झाले. त्यावर किती परिणाम झाला याबाबतची आकडेवारी उपलब्ध नाही. हा आकडा येत्या काळात समोर येईलच. परंतू, सध्या स्थितीत तरी आगोदरच असलेल्या आर्थिक मंदीमध्ये कोरोना व्हायरस म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असल्याचे चित्र स्पष्ट आहे.