Political Parties in Maharashtra (File Photo)

Maharashtra Assembly Election 2019: विधानसभा निवडणूक 2019 पूर्वी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (BJP) निवडणुका जिंकण्याचे एक जुनेच पण आक्रमक आणि भलेतच व्याप्त कसब दाखवत आहे. पक्षविस्ताराच्या नावाखाली नवे कार्यकर्ते काही प्रमाणात निर्माण करत असतानाच थेट विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनाच भाजपमध्ये प्रवेश देण्याचा सपाटा भारतीय जनता पक्षाने लावला आहे. भाजपचा मित्र पक्ष शिवसेना (Shiv Sena) हा सुद्दा हाच कित्ता गिरवताना दिसत आहे. दरम्यान, काँग्रेस (Congress) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)पक्षातून मोठ्या प्रमाणाव इनकमींग होत असल्याने भाजप, शिवसेना पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांचे धाबे मात्र दणाणले आहेत. आयारामांना पायघड्या तर, मग आम्ही काय फक्त सतरंज्याच उतरायच्या का? असा संतप्त सवाल विचारत दबक्या आवाजात तळागाळातील भाजप, शिवसेना पक्षनिष्ठांमध्ये चर्चा आहे.

भाजप प्रथम तर शिवसेना द्वितीय क्रमांकावर

गेल्या काही दिवसांध्ये पक्ष वाढविण्यासाठी विरोधी पक्षातील (खास करुन राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस) प्रमुख नेत्यांचा पक्षप्रवेश घडवून आणण्याचा सपाटाच भाजपने लावला आहे. सध्यास्थितीत पक्षांतर करुन इतर पक्षामध्ये जाण्याचा वेग भाजपमध्ये अधिक आहे. तर, भाजपमध्ये आगोदरच काहींनी पक्षप्रवेश झाल्याने तिथे जागा रिकामी नसेल तर अनेक मंडळी आता शिवसेनेकडेही पर्यायी मोर्चा वळवताना दिसत आहेत. त्यामुळे सध्यास्थितीत आयारामांना पायघड्या घालण्यात भाजप प्रथम तर शिवसेना द्वितीय क्रमांकावर आहे. बाहेरुन आलेल्यांना थेट डोक्यावर बसवले जात असल्याने आम्हाला कधी संधी मिळणार असा सवाल विचारत आम्ही केवळ सतरंज्याच अंथरायच्या काय? असा प्रश्न जुन्या, जाणत्या आणि पक्षवाढीसाठी सत्ता नसतानाच्या काळात प्रयत्न केलेल्या कार्यकर्त्यांना पडू लागला आहे.(हेही वाचा, महाराष्ट्राच्या राजकारणातील धक्कादायक दिवस; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गजांचा आज भाजप प्रवेश; जाणून घ्या प्रमुख चेहरे)

व्हिडिओ

आश्वासनांचे काय?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधून थेट भाजपत आलेल्या नेत्यांचे जाहीर पक्षप्रवेश होत आहेत. मात्र, हे पक्ष प्रवेश करताना भाजप आणि पक्षांतर करणारे हे नेते यांच्यात नेमकं काय ठरलं आहे याचा तपशील अद्याप बाहेर आला नाही. परंतू, राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, पक्षांतर करताना या नेत्यांनी भाजपसमोर काही अटी ठेवल्या आहेत. तसेच, भाजपनेही या नेत्यांना काही आश्वासनं दिली आहेत. परंतू, राजकीय वर्तुळात चर्चा असली तरी ही आश्वासनं नेमकी काय आहेत हेसुद्धा बाहेर आले नाही. मात्र, असे असले तरी, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील आयारामांची वाढती संख्या पाहून, भाजप शिवसेना पक्षनिष्ठांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे.