महाराष्ट्राच्या राजकारणातील धक्कादायक दिवस; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गजांचा आज भाजप प्रवेश; जाणून घ्या प्रमुख चेहरे
Political parties in Maharashtra | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Election 2019: महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस (बुधवार, 31 जुलै 2019) सत्ताधारी भाजप (BJP) -शिवसेना (Shiv Sena) आणि विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Vidhan Sabha Election 2019) च्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मुंबई येथील गरवारे क्लब येथे भाजपाचा हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडू शकतो. या संभाव्य पक्ष प्रवेशात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांचा समावेश असल्याने राज्यातील विरोधी पक्षांना प्रचंड मोठी राजकीय किंमत चुकवावी लागणार आहे.

मुंबईत पार पडणाऱ्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज आहेत. त्यात काही विद्यमान आमदारही आहेत. ज्यांनी नुकताच आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेतील संभाव्य नावे. (हेही वाचा, संदीप नाईक, वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले, कालिदास कोळंबकर यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपमध्ये उद्या प्रवेश करणार असल्याची चर्चा)

भाजपमध्ये प्रवेश करणारे संभाव्य नेते

 

भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेते/आमदार

नेता/आमदाराचे नाव

मतदारसंघ/कार्यक्षेत्र

राजकीय पक्ष

संदीप नाईक (गणेश नाईक यांचे पूत्र) ऐरोली विधानसभा मतदारसंघ (नवी मुंबई) राष्ट्रवादी काँग्रेस
शिवेंद्रराजे भोसले जावळी विधानसभा मतदारसंघ (सातारा) राष्ट्रवादी काँग्रेस
वैभव पिचड अकोले विधानसभा मतदारसंघ (नगर) राष्ट्रवादी काँग्रेस
कालिदास कोळंबकर वडाळा विधानसभा मतदारसंघ (मुंबई) राष्ट्रीय काँग्रेस

काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चेत असणारी महत्त्वाची नावे

दरम्यान, वरील नेत्यांसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इतरही नेत्यांचा भाजप प्रवेशात समावेश असल्याची चर्चा आहे. या नेत्यांची नावे पुढील प्रमाणे.

भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेते/आमदार

नेता/आमदाराचे नाव

मतदारसंघ/कार्यक्षेत्र

राजकीय पक्ष

संग्राम जगताप नगर
अवधूत तटकरे श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेस
कैलास चिकटगावकर वैजापूर -
ज्योती कलानी उल्हासनगर -
सिद्धराम म्हेत्रे अक्कलकोट
जयकुमार गोरे मान-खाटाव राष्ट्रवादी काँग्रेस
अब्दुल सत्तार सिल्लोड राष्ट्रीय काँग्रेस
भारत भालके माळशिरस
राणा जगजितसिंह पाटील उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस

दरम्यान, भाजपमध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. भाजप हे दबावाचे राजकारण करत असून, त्या माध्यमातूनच ते विरोधी पक्ष फोडत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर, या आरोपाला प्रत्युत्तर देताना भाजपने म्हटले आहे की, भाजप हा कोणताही पक्ष फोडत नसून, भाजपचे विचार आवडल्याने इतर पक्षातील लोक स्वत:हून पक्षात आकृष्ट होत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना प्रवेश देत आहोत, असे म्हटले आहे.