ABHA Health Card: महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) ने सोमवारी नागरिकांसाठी ABHA (Ayushman Bharat Digital Health Account) हेल्थ कार्ड लॉन्च केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मिशन (Digital Health Mission) अंतर्गत ABHA हेल्थ कार्ड सुरू करण्यात येणार आहे. या डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत एक युनिक हेल्थ कार्ड बनवले जाणार असून या कार्डद्वारे रुग्णाच्या आरोग्याची सर्व माहिती नोंदवली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी या कार्डसाठी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे केले आहे.
अधिक माहिती देताना सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, "ABHA डिजिटल हेल्थ आयडी कार्ड सर्व वैद्यकीय माहिती एकाच ठिकाणी साठवून ठेवेल. त्यामुळे, नागरिक त्यांचा ओळखपत्र क्रमांक डॉक्टर आणि विमा कंपनी यांसारख्या वैद्यकीय व्यावसायिकांशी शेअर करू शकतात आणि ते तात्काळ वैद्यकीय माहिती पाहू शकतात. हेल्थ कार्ड आयडीमध्ये नागरिकाने किती वेळा डॉक्टरांना भेट दिली आणि त्यांनी पेशन्टला कोणती औषध दिली यासंदर्भात सर्व माहिती असेल. यात नागरिकांचे आरोग्य रेकॉर्ड किंवा इतिहास असेल." (हेही वाचा -Safe Mother Safe Home: नवरात्री निमित्त राज्यातील महिलांसाठी विशेष आरोग्य अभियान, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची मोठी घोषणा)
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, एखाद्या नागरिकाने एबीएचए हेल्थ आयडी कार्ड नोंदणी आणि डाउनलोड केल्यास अनेक फायदे आहेत. या कार्डमुळे तुम्ही तुमची सर्व वैद्यकीय माहिती जसे की चाचण्या, निदान, औषधांचे प्रिस्क्रिप्शन इ. काही क्लिकवर ऍक्सेस करू शकता. तुम्ही तुमचे वैद्यकीय रेकॉर्ड हॉस्पिटल, दवाखाने, डॉक्टर्स इत्यादींसोबत सहज शेअर करू शकता. अशा प्रकारे, तुम्ही नवीन परिस्थितीतही वैद्यकीय सेवा मिळवू शकता. तसेच तुम्ही हेल्थकेअर प्रोफेशनल रजिस्ट्री (HPR) मध्ये प्रवेश करू शकता जे भारतातील सर्व डॉक्टरांच्या तपशीलांचे संकलन आहे. याशिवाय तुम्ही या कार्डच्या माध्यमातून हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री (HFR) मध्ये देखील प्रवेश करू शकता. हे कार्ड आयुष उपचार सुविधांमध्येही वैध आहे. उपचारांमध्ये आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यांचा समावेश होतो, असंही या अधिकाऱ्याने सांगितले.
या अंतर्गत डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत युनिक हेल्थ कार्ड बनवण्यात येणार असून या कार्डद्वारे रुग्णाची आरोग्यविषयक सर्व माहिती एकत्रितरित्या नोंदवली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी या कार्डसाठी नोंदणी करून घ्यावी असे आवाहन मी आपल्याला करीत आहे.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 26, 2022
हेल्थ कार्ड नोंदणीसाठी नागरिक आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. डॉ. प्रदीप व्यास यांनी पुढे बोलताना सांगितलं की, राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग आरोग्य सेवा पुरवठादारांसाठी आणि सरकारी रुग्णालये, खाजगी रुग्णालये, सुपर स्पेशालिटी रुग्णालये आणि इतरांसह विविध संस्थांसाठी अद्वितीय आयडी तयार करत आहे. विभागाने आतापर्यंत 1.50 कोटी आरोग्य खाते आयडी तयार केले आहेत.