25 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा; Rajesh Tope यांच्या केंद्राकडे मागण्या
Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लस पुरवठा करावा. 25 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश द्यावेत, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज विविध राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत राज्यांमधील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी टोपे यांनी विविध मुद्दे मांडताना महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

यावेळी आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, राज्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज 4 लाखांहून अधिक जणांना लसीकरण केले जात आहे. वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रणासाठी लसीकरण जास्त उपायकारक असून राज्याने त्याला गती दिली आहे. राज्यातील लस वाया जाण्याचे प्रमाणही खूपच कमी आहे. राज्यात सध्याचा लसींचा साठा लक्षात केंद्र शासनाकडून तातडीने मागणीप्रमाणे पुरवठा होणे गरजेचे आहे. कोवॅक्सिनची मागणी वाढल्याने त्याचाही अतिरिक्त पुरवठा करावा, असे टोपे यांनी सांगितले.

राज्यात सध्या रुग्ण संख्या आढळतेय त्यात 25 ते 40 वयोगटातील संख्या अधिक आहे आणि या वयोगटातील नागरिकांना व्यवसायानिमित्त बाहेर पडावे लागते. ही बाब लक्षात घेऊन 25 वर्षांवरील नागरिकांचा समावेश लसीकरणाच्या प्राधान्य यादीत करण्याची मागणी टोपे यांनी केली. तसेच महाराष्ट्रालगतची जी राज्य आहेत जेथे ऑक्सिजनचा वापर जास्त नाही त्यांच्याकडून ऑक्सिजनचा पुरवठा महाराष्ट्राला व्हावा यासाठी केंद्र शासनाने या राज्यांना निर्देश देण्याची विनंती टोपे यांनी यावेळी केली. (हेही वाचा: देशातील एकूण कोरोना विषाणू सक्रिय प्रकरणांपैकी 58 टक्के प्रकरणे महाराष्ट्रात; केंद्राने व्यक्त केली चिंता, राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये पाठवली आरोग्य पथके)

यासह, महाराष्ट्रातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन राज्यात नवीन स्ट्रेन आला आहे का, याबाबत राष्ट्रीय रोग नियंत्रण केद्रांकडून संशोधन होऊन मार्गदर्शन करण्यात यावे. आरोग्य सेवेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातून निधी  द्यावा, व्हेंटिलेटर्सच्या 100 टक्के वापरासाठी तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात यावे, असे श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले.