महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातले आहे. परवा राज्यात 57,074 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली होती व काल 47 हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळून आले होते. महाराष्ट्राच्या अशा स्थितीबाबत केंद्र सरकारही चिंतेत आहे. आज केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण सक्रिय प्रकरणांपैकी 58 टक्के सक्रिय प्रकरणे महाराष्ट्रात आहेत, तर देशातील एकूण मृत्यूंपैकी 34 टक्के मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. याचबाबत सध्या केंद्र सरकारच्या टीम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
राजेश भूषण यांनी सांगितले की, कोविडची सर्वात जास्त सक्रीय प्रकरणे असलेल्या पहिल्या 10 जिल्ह्यांमधील सात जिल्हे महाराष्ट्रातील असून, कर्नाटक, छत्तीसगड आणि दिल्लीतील प्रत्येकी एक आहेत. महाराष्ट्रासह पंजाब आणि छत्तीसगडमध्ये होणारी मृत्यूची नोंद ही चिंतेची बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, आम्ही आरटी-पीसीआर चाचण्यांची (RT-PCR Tests) टक्केवारी वाढवण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत. गेल्या काही आठवड्यांत महाराष्ट्रात याबाबत घट होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील आरटी-पीसीआर पद्धतीने केलेल्या चाचण्यांचे प्रमाण केवळ 60 टक्के होते. आम्ही राज्यांना हे प्रमाण 70% किंवा त्याहून अधिक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
छत्तीसगड हे देशासाठी सध्या चिंतेचे कारण आहे. एक लहान राज्य असूनही, एकूण कोविड प्रकरणांपैकी 6 टक्के प्रकरणे आणि देशातील एकूण मृत्यूंपैकी 3 टक्के मृत्यू तिथे नोंदविले गेले आहेत. कोरोना संक्रमणाच्या दुसर्या लाटेमध्ये छत्तीसगडची स्थिती ढासळली असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले.
केंद्राने महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाबमध्ये 50 सार्वजनिक आरोग्य पथके तैनात केली आहेत. या टीम्स महाराष्ट्रातील 30 जिल्हे, छत्तीसगडचे 11 जिल्हे आणि पंजाबमधील 9 जिल्ह्यांना भेट देतील. ते कोरोना नियंत्रण व उपायांमध्ये राज्य आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाला मदत करतील. तसेच ते राज्य सरकार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दररोज अहवाल सादर करतील. (हेही वाचा: Corona Vaccination: कोविड-19 लसीचे 8 दशलक्षपेक्षा जास्त डोस देणारे महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य)
नीतियोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांच्यामते, देशात साथीच्या आजाराचा परिणाम वाढला आहे. परिस्थितीला गांभीर्याने घेतले पाहिजे. मागच्यावेळी पेक्षा आता संसर्गाचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे स्थिती आणखीनच खराब झाली आहे. मात्र आपण हा विषाणू नियंत्रणात आणू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.