Corona Vaccination: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग अतिशय जलद गतीने पसरत आहे. मात्र, महाराष्ट्रात कोरोना रोगप्रतिबंधक लस टोचण्याची मोहिम जोरदार सुरू आहे. कोविड-19 लसीचे 8 दशलक्षपेक्षा जास्त डोस देणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य बनले आहे. महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये लसीकरण मोहिम वेगाने राबवली जात आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत 7.7 दशलक्ष तर उत्तर प्रदेशात 7.2 दशलक्ष डोस देण्यात आले आहेत.
भारतात सध्या कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट सुरू आहे. या लाटेत देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आढळून येत आहेत. याचं पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यातील 25 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना लस देण्याची विनंती केली आहे. (वाचा - Raj Thackeray यांचा परप्रांतीयांवर पुन्हा हल्लाबोल; महाराष्ट्रातील कोरोना आकडा वाढवण्याचं सांगितलं 'हे' एक कारण!)
मुख्यमंत्र्यांनी या पत्रात असं म्हटलं आहे की, लोकांना कामानिमित्त घराबाहेर पडावं लागत आहे. तरुणांमध्ये कोरोना विषाणूची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे 25 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिल्यास कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होईल. कोरोना विषाणूचा संसर्ग व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी 25 वर्षांवरील लोकांना लसीकरणासाठी पात्र ठरविण्यात यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे.
याशिवाय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला कोविड लसीचे दीड कोटी अतिरिक्त डोस द्यावे, अशी विनंती केली आहे. ज्यामुळे राज्य सरकार मुंबईसह सहा जिल्ह्यांतील 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तीन आठवड्यांत पूर्ण करू शकेल. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने कमी होण्यास मदत होईल.
दरम्यान, राज्यात सोमवारी 47288 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तसेच 26252 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. राज्यात सध्या एकूण 451375 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.36% झाले आहे.