प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: Twitter/bhatia_niraj23)

गेल्या आर्थिक वर्षात बीएमसीकडे (BMC) खड्ड्यांबाबत (Pothole) 48,608 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 33,791 खड्डे मार्च 2023 पर्यंत ठीक करण्यात आले आहेत, तर उर्वरित 14,817 खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजवण्याचे नागरी संस्थेचे उद्दिष्ट आहे. दर पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. त्यामुळे बीएमसीने 125 कोटींहून अधिक खर्च करून खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय, खड्डे बुजवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डांबर आणि खडी खरेदीसाठी 50 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

कोल्ड मिक्सची पूर्वीची पद्धत कुचकामी ठरल्यामुळे नागरी संस्थेने खड्डे भरण्यासाठी रिऍक्टिव्ह डांबर आणि जलद कडक होणा-या मिश्रण तंत्रज्ञानाकडे स्विच केले आहे. नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवकांकडून जोरदार आक्षेप घेतल्यानंतर बीएमसीने रस्त्यांचे पॅचिंगचे मार्ग बदलले.

गेल्या वर्षी आलेल्या खड्ड्यांच्या तक्रारीबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याबद्दल नागरी संस्थेला फटकारताना, बीएमसीचे विरोधी पक्षनेते आणि माजी नगरसेवक रवी राजा म्हणाले, ‘मला वाटले की खड्डे फक्त पावसाळ्यातच दिसतात पण इथे ही समस्या बारमाही आहे असे दिसते. बीएमसी प्रशासन काय करत आहे? मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या तक्रारी आल्या आहेत त्यावरून तयार होत असलेले रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे सूचित होते. आम्ही त्यांना (अधिकाऱ्यांना) खड्ड्यांबद्दल विचारले असते, पण बीएमसीमध्ये प्रशासक आहे. तिथे विचारायला कोणीही लोकप्रतिनिधी नाही. (हेही वाचा: Jalgaon: प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णालयांमध्ये बाळांची अदलाबदल; आता DNA चाचणीद्वारे पटवली जाणार पालकांची ओळख)

भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा म्हणाले, “मी बीएमसी आयुक्त आणि प्रशासनाला हा नंबर गेम थांबवण्याची विनंती करत आहे. त्यांनी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर लक्ष केंद्रित करावे. तरीही खड्डे दिसत असतील तर त्यासाठी कंत्राटदारांना जबाबदार धरून रस्ते दुरुस्त करण्याचे निर्देश द्यावेत.’ राज्य सरकारने 6,000 कोटी रुपये खर्चून मुंबईतील 400 किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेतले आहे.