
औरंगाबाद येथील लेबर कॉलनी (Aurangabad Labor Colony) परिसरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या घरांचे पाडकाम सुरु झाले आहे. ही घरे जमीनदोस्त करण्यासाठी सकाळी साडेसहा वाजलेपासूनच प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. या ठिकाणीची तब्बल 338 घरे पाडण्यासाठी 50 जेसीबी, मोठ्या प्रमाणावर कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत. याशिवाय या परिसरात जमावबंदी लागू केली असून, मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही वाढवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार या घरांचे पाडकाम सुरु असले तरी स्थानिकांनी मात्र या कारवाईस सक्त विरोध दर्शवला आहे.
लेबर कॉलनी परिसरात सुरु असलेल्या पाडकामाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना कारवाई सुरु असलेल्या परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. इथे दाट लोकवस्ती असून काही नागरिकांनी इथल्या घरांचा ताबा सोडला आहे. काही लोक ताबा सोडण्याच्या तयारीत आहेत. तर काही लोक मात्र अद्यापही इथेच राहात आहेत. जे नागरिक अद्यापही याच ठिकाणी राहात आहेत त्यांचा या कारवाईला तीव्र विरोध आहे. (हेही वाचा, Beating: औरंगाबादमध्ये मध्यरात्रीनंतर दुकान उघडे ठेवल्याने तरुणाला पोलिसांकडून बेदम मारहाण)
लेबर कॉलनी परिसरातील ती 388 घरे ही खूपच जूनी असून मोडकळीस आली आहेत. परिणामी सर्वोच्च न्यायालयानेही ती पाडण्याचा आदेश दिला. असे असले तरी स्थानिक रहिवाशांनी मात्र ही घरे पाडण्यास विरोध केला आहे. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात 144 कलम लागू केले आहे. या कलमानुसार या परिसरातील नागरिक आज दिवसभर कारवाई सुरु असे पर्यंत या परिसरात दाखल होऊ शकणार नाहीत. जिल्हा प्रशासनातर्फे ही कारवाई केली जात आहे.