Nashik Unlock Guidelines: नाशिकमधील सर्व दुकाने आता संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार, पालकमंत्री छगन भुजबळांनी दिली 'ही' महत्त्वाची माहिती
Maharashtra Unlock | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र अनलॉकच्या टप्प्यात आला असून आता हळूहळू लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता आणण्यात आली आहे. राज्यात कोरोनाची स्थिती (Coronavirus Situation in Maharashtra) ब-यापैकी आटोक्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातही निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी याबाबत माहिती दिली आहे. यानुसार, नाशिकमधील सर्व दुकाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे लवकरच आदेश काढणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

नाशिकमधील अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने सुरु ठेवण्याचा कालावधी वाढविण्यात आल्याने दुकानदारांस दिलासा मिळाला आहे. यासह नाशिकमध्ये काय सुरु आणि काय बंद राहणार?

हेदेखील वाचा- Mumbai Unlock: राज्य शासनाच्या 'ब्रेक द चेन' आदेशानुसार मुंबईत तिसऱ्या टप्यात होणार अनलॉक, जाणून घ्या काय सुरु आणि काय बंद राहणार

- सर्व दुकान,आस्थापना 4 वाजे पर्यंत सुरू राहणार

- शनिवार, रविवार पूर्णतः बंद ठेवण्याचा विचार

- सोमवार पासून नवीन नियमावली लागू होणार

- मॉल्स, थेटर्स, नाट्यगृह बंद राहणार

- हॉटेल 50 टक्के क्षमतेने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील, नंतर पार्सल सेवा सुरू होणार

- ओपन गार्डन, जॉगिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 पर्यंत सुरू राहणार

- गव्हर्नमेंट ऑफिसेस 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार

- लग्न 50 लोक, अंत्यविधी 20 लोक, तसेच मीटिंग 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार

- बांधकाम 4 वाजे पर्यंत सुरू राहील

- नाशिक जिल्ह्यात रात्री 12 ते दुपारी 5 पर्यंत जमावबंदी लागू असेल, त्यानंतर 5 ते रात्री 12 पर्यंत संचारबंदी लागू असेल

- लवकरच जिल्हाधिकारी सुरज मांढरे आदेश काढणार

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशानुसार सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून उद्योग व्यवसाय सुरू करावेत, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

दरम्यान “जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस आजारातून शस्त्रक्रियेद्वारे बरे झालेल्या परंतु एखादा अवयव कायमस्वरूपी बाधित झालेल्या रुग्णांची सविस्तर माहिती घेण्यात यावी. तसेच तिसऱ्या स्तरातील निर्बंधच्या काळात कामावर जाणाऱ्या कोणालाही त्रास होणार नाही, यासोबतच शहरातील ज्या रस्त्यांवर अवाजवी गर्दी होते त्याठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी नियोजन करावे”, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.