Ajit Pawar, Partha Pawar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Ajit Pawar resigns as PDCC director: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकदोन नव्हे तर तब्बल 32 वर्षांनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Pune District Central Co-Operative Bank Ltd) अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरु आहेत. या ठिकाणी त्यांचेच चिरंजी पार्थ पवार (Parth Pawar) यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार यांच्या कृपेने जेव्हा अजित पवार राजकारणात आले तेव्हा त्यांनी याच बँकेच्या अध्यक्ष पदावरुन राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा केला होता. त्यांचे चिरंजीवही त्याच पावलावर पाऊल टाकणार का? याबाबत उत्सुकता आहे.

अजित पवार यांनी राजकारणामध्ये अनेक पदं भूषवली. ते खासदार झाले, आमदार झाले. मंत्रीही झाले. पाठिमागील अनेक वर्षे ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी यापूर्वी गृहमंत्री, अर्थमंत्री आणि इतरही अनेक पदांवर काम केले आहे. राज्य विधीमंडळामध्ये ज्येष्ठ आमदार म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. खास करुन रोखठोक बोलणारे व्यक्तीमत्व, काम होणार की नाही ते स्पष्ट तोंडावर सांगणारे, प्रशासनावर वचक असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. दरम्यानच्या काळात त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतारही आले. त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे आरोपही झाले, पण काही झाले तरी त्यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद सोडले नाही. पाठिमागील अनेक वर्षांच्या कारकिर्दीमध्ये प्रथमच त्यांनी आपल्या जिल्हा बँक अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे दादांच्या मनात काय असा प्रश्न विचारला जातो आहे.

पार्थ पवार यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर ती अगदीच तोळामासा आहे. अजित पवार यांचे चिरंजीव येवढी ओळख सोडली तर त्यांच्या पाठिशी ना राजकीय अनुभव आहे ना संघटन. जी काही ताकद आहे ती त्यांच्या पीताश्रींचीच आहे. नाही म्हणायला लोकसभा निवडणूक 2019 मध्ये पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर उभे राहीले खरे. पण, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारालावा लागला. हा पराभव अगदीच दणदणीत होता. जो अजित पवार यांच्या काहीसा अधिकच जिव्हारी लागल्याचे बोलले जाते.

पार्थ पवार यांनी लोकसभा निडणुकीत केलेल्या पहिल्याच भाषणात बोऱ्या वाजला होता. त्यांना मराठी मुलुखात राऊनही धड मराठीही बोलता येत नाही, अशी टीका त्या वेळी झाली होती. आपण पहिल्यांदाच बोलतो आहोत, त्यामुळे काही चुका-मुका झाल्या तर समजून घ्या, असे विधान त्यांनी केले होते. उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांचा नातू अशी भली दांडगी परंपरा पाठी असताना पार्थ यांना धड मराठी बोलता येऊ नये हा त्यावळी लोकचर्चेचा आणि विरोधकांच्या खिल्लीचा विषय ठरला होता.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर पार्थ पवार हे राजकीय पटलावरुन अचानक बाजूला झाले. त्यानंतर ते चर्चेत आले ते एका पत्रामुळे. हिंदुत्व आणि राममंदिर अशा विषयावरुन त्यांनी एक पत्र लिहीले होते. जे सोशल मीडियात व्हायरल झाले. या पत्रावरुन शरद पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता, त्यांच्या मतांना (पार्थ पवार) आपण कवडीचीही किंमत देत नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले होते. त्यामुळे तिथेही पार्थ पवार यांचा चांगलाच हिरमोड झाला होता. आता झाले गेले सगळे काही पाठिशी टाकून पार्थ पुन्हा एकदा नव्याने श्रीगणेशा करत असल्याची चर्चा आहे. त्याला कसे यश येते हे येणारा काळच ठरवणार आहे.