राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) आता काका शरद पवार यांना घरच्या मैदानावर म्हणजेच बारामती येथूनही आव्हान उभे करण्याच्या विचारात आहेत का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. त्याचे कारण म्हणजे कधी नव्हे ते पहिल्यांदाच त्यांचे धाकले चिरंजीव जय पवार (Jai Pawar) हे बारामतीच्या राजकारणा सक्रीय झाल्याचे पाहायला मिळते आहे. खास करुन बारामतीमधील शारदा प्रांगण येथे अजित पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेवेळी आणि बारमतीमध्ये आयोजित केलेल्या रोड शोमध्ये ते मोठ्या प्रमाणावर सक्रीय दिसले. कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
अजित पवार यांनी थोरल्या चिरंजीवांना राजकारणात लॉन्च करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो पूरता फसला. तेव्हापासून पार्थ पावर राजकारणात फारसे सक्रीय दिसत नाही. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मावळ मतदारसंघातून पार्थ यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. तेव्हापासून ते फारसे सक्रीय दिसले नाहीत. राजकारणाच्या पहिल्यावहिल्या एन्ट्रीच्या भाषणातही ते लोकांच्या टीकेचे धणी ठरले होते.
दरम्यान, जय पवार यांचे अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. जय पवार यांच्या भोवती कार्यकर्त्यांचा गराडा पाहायला मिळाला. बारामतीची सूत्रे हाती घ्या. संघटना काय असते ते दाखवून देतो, असे म्हणत कार्यकर्यांनी त्यांना साद घातली. अर्थात जय पवार यांनी सध्यातरी कोणताही कौल दिला नाही. मात्र, तुम्ही अजित दादांशी बोलून घ्या. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल येताच मी तयारीला लागतो असे त्यांनी म्हटले.त्यामुळे आगामी काळात पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या जोडीला पार्थ पवार आणि त्यांच्यासोबत जय पवार दिसल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी चर्चा आहे.