पार्थ पवार सातत्याने शरद पवार आणि एनसीपी पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका जाहीरपणे घेत असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये आज शरद पवारांनी पार्थ इमॅच्युअर आहेत आम्ही त्यांच्या बोलण्याला कवडीची किंमत नाही असं म्हटलं आहे. यावर पार्थ पवारांची प्रतिक्रिया समोर आली नसली तरीही भाजपाच्या नितेश राणे यांनी पार्थची पाठराखण केल्याचं दिसत आहे. ट्वीटरवरून प्रतिक्रिया देताना , 'आज परत सांगतो.. पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा !!' असं ट्वीट केलं आहे.
कोरोना संकटकाळामध्ये राम जन्मभूमी मंदिराचा घाट घालणार्या भाजपावर टीका केल्यानंतर पार्थनेच राम मंदिराला शुभेच्छा दिल्या आहे. त्यावेळेस खासदार सुप्रिया सुळे यांनी ही त्याची खाजगी भूमिका असल्याचं म्हटलं होतं. तर सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणामध्ये गुढ उकलण्यामध्ये महाराष्ट्र पोलिस, मुंबई पोलिस दल सक्षम असल्याचं सांगत सीबीआय चौकशीची गरज नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान पार्थ पवारनेच काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्याचं पत्र देखील दिलं होतं. महाराष्ट्रात सध्या सुशांतसिंग राजपूत प्रकरणावरून राजकारण रंगत आहे. विरोधक यामध्ये ठाकरे परिवाराचं नाव समोर येत असल्याने सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत.
नितेश राणे ट्वीट
आज परत सांगतो..
पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!!
थांबू नकोस मित्रा !!
— nitesh rane (@NiteshNRane) August 12, 2020
पार्थ पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत. पार्थ पवार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला होता.