पुणे जिल्ह्याचा दादा कोण? यावरुन राज्याच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांमध्ये शितयुद्ध सुरु असल्याची चर्चा आहे. या दोन्ही मंत्र्यांना 'दादा' नावानेच संबोधले जाते. त्यापैकी एक राज्याचा उपमुख्यंत्री आहे. तर दुसरा पुण्याचा पालकमंत्री. नावच घेऊन सांगायचे तर एक आहेत अजित पवार (Ajit Pawar) आणि दुसरे आहेत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil). दोघांनाही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पदामध्ये भलतीच ऋची. त्यामुळे दोघांमध्ये या पदावरुन जोरदार रस्सीखेच असल्याचे समजते. त्यात एकाला हे पद हवे आहे तर दुसऱ्याला ते सोडायचे नाही. त्यामुळे पडद्यावर असलेला खेळीमेळीचा सामना पडद्यामागे शह-काटशहानेच खेळला जात असल्याचे चित्र आहे.
विद्यमान स्थितीत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. अजित पवार वार यांचा या पदावर डोळा आहे. वास्तविक पाहता पाठिमागची अनेक वर्षे या जिल्ह्याचे पालकमंत्री पद पवार यांनी सांभाळले आहे. अपवाद फक्त जेव्हा भाजप, शिवसेना सत्तेत होती तेव्हाच त्यात बदल झाला आहे. आता अजित पवार राष्ट्रवादीतील काही आमदारांचा गट घेऊन भाजपसोबत सत्तेत गेले आहेत. ते उपमुख्यमंत्रीही झाले आहेत. त्यामुळे त्यांना हे पद हवे आहे. दुसऱ्या बाजूला चंद्रकांत पाटील हे कोथरुड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे सत्तेत येताच त्यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले. भाजप प्रदेशाध्यक्ष असल्यापासून त्यांचे पुण्यावर विशेष लक्ष आहे.
पाटील नावाला कारभारी 'दादा'
दरम्यान, चंद्रकांत पाटील नावालाच पुण्याचे पालकमंत्री असून सर्व कारभार अजित पवारच पाहतात की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. याला कारणही तसेच घडले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त, पीएमआरडीएचे आयुक्त अशा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दस्तुरखुंद्द अजित पवार यांनी बैठका घेतल्या. धक्कादायक म्हणजे या बैठकांना पुण्याचे पालकमंत्री असूनही चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण नसल्याचे समजते. खासगी वृत्तवाहीनी एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. अजित पवार यांनी अशा बैठका घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. या पूर्वीही त्यांनी अशा प्रकारच्या अनेक बैठका घेतल्या आहेत.
या बैठका घेण्याचा मला अधिकार
दरम्यान, प्रसारमाध्यमांनी विचारले असता या बैठका घेण्याचा मला अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या बाजूला तोंडावर आलेल्या गणपती उत्साच्या तयारीबाबतही गणेश मंडळांची एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण असले तरी नेतृत्व अजित पवार यांच्याकडे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अजित पवार विरुद्ध चंद्रकांत पाटील असा सामना तर रंगला नाही ना? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.