Uddhav Thackeray | (Photo Credit - Twitter)

Bhausaheb Wakchaure Shivsena News: एकनाथ शिंदे यांनी भलेही 40 आमदार सोबत घेत शिवसेना पक्षाला भगदाड पाडल्याचे चित्र निर्माण केले असले तरी, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) निश्चित आहेत. आजही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) गटामध्ये इनकमिंग सुरुच आहे. ते आपल्या गटाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढवत आहेत. विविध पातळीवर होणारे पक्षप्रवेश त्याचेच द्योतक आहे. शिर्डी येथेही उद्धव ठाकरे आपला पक्ष पुन्हा नव्याने मजबूत करत आहेत. येथील माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा एकदा स्वगृही परतत आहेत. मुंबईमध्ये त्यांचा शिवसेना (UBT) पक्षप्रवेश आज पार पडतो आहे. दस्तुरखुद्द पक्षप्रमुखांच्याच उपस्थित हा प्रवेश होत असल्याने वाकचौरे यांचे आगामी स्थान काय असेल हे सांगण्यास ज्योतिषाची गरज नाही.

भाऊसाहेब वाकचौरे हे खरेतर मुळचे शिवसैनिक. लोकसभा निवडणूक 2009 मध्ये त्यांनी शिवसेना तिकीटावर निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. रामदास आठवले यांचा पराभव करत त्यांनी हा विजय मिळवला होता. दरम्यान, मधल्या काळात ते शिवसेनेवर नाराज झाले. त्यामुळे 2014 मध्ये लोकसभेचे तिकीट जाहीर होऊनसुद्धा त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि निवडणूक लढवली. पण त्यात त्यांचा पराभव झाला. पुढे त्यांनी काँग्रेस मार्गे भाजप असा प्रवास करत आता शिवसेनेत परतायचे ठरवले आहे. सलग दोन वेळा लोकसभा पराभूत झाल्यानंतर ते शिवसेनेकडे परतले आहेत हे विशेष.

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे 18 खासदार निवडून आले. त्यापैकी 13 जण हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीस सुरुवात केली आहे. परिणामी प्रत्येक मतदारसंघात विरोधकांना तगडा उमेदवार देण्यावर शिवसेना (UBT) पक्षाचा भर आहे. त्यामुळे इनकमींग आणि सोबत असलेल्या लोकांना ताकद देण्याचे काम ठाकरे गट करतो आहे.