मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ज्या ठिकाणहून येथा त्या ठाणे (Thane ) येथे सर्व काही ओके पण रस्ते मुळीच नाही ओके असे नागरिक म्हणून लागले आहेत. मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या ठाण्यात रस्त्यांची इतकी दुर्दशा झाली आहे की, लोकांना विनाकारण प्राण गमवावे लागत आहे. रस्त्यांवरील खड्डे जीवघेणे ठरत आहे. ठाण्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एका दुचाकी स्वाराला आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही घटना घोडबंदर रोडवरील काजूपाडा या ठिकाणी घडली. रस्त्यांवरुन दुचाकी चालवत असताना ती खड्ड्यात गेल्याने तोल जाऊन हा दुचाकीस्वार खाली पडला आणि तोवर पाठीमागून आलेल्या बसच्या चाकाखाली गेला. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर अवघ्या काहीच मिनीटांमध्ये पुन्हा त्याच ठिकाणी अशीच घटना घडली. पण दैव बलवत्तर म्हणून दुसरा दुचाकीस्वार वाचला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्या रस्ते नॉट ओके असेच नागरिक म्हणू लागले आहेत.
रस्तेअपघातात होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण मोठे आहे. वास्तविक पाहता शहरांमध्ये रस्ते अपघात मोठ्या प्रमाणावर होण्याचे विशेष कारण असत नाही. परंतू, शहरांतील रस्त्यांवर असलेले खड्डे इतक्या मोठ्या प्रमाणावर असतात की, अपघात तर होतातच. परंतू, त्यासोबतच रस्त्यावर वाहतूक कोंडी, त्यामुळे नागरिकांना होणारा नाहक त्रास, प्रदुषण अशा असंख्य गोष्टी घडत असतात. असाच काहीसा प्रकार ठाणे येथील कोपरी पुलावर पाहायला मिळतो आहे. कोपरी पुलावर होणारी वाहतूक कोंडी आता नेहमीचीच झाली आहे. वर्षातील कोणत्याही दिवशी जरी आपण कोपरीला गेलात तरी आपल्याला वाहतूक कोंडी पाहायला मिळतेच. धक्कादायक म्हणजे कोपरी ब्रीजचे उद्घाटन होऊन एक वर्षही झालं नाही, तरीही त्याची मोठी दुरावस्था झाल्याचे चित्र आहे. (हेही वाचा, Pune: पुणे येथे स्कूल बसखाली चिरडून 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू, परिसरात हळहळ)
मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपात ठाण्याला मुख्यमंत्री मिळाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालून शहराच्या विकासावर अधिक भर द्यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ठाण्याच्या विकासाची मुहूर्तमेढ ही खड्डेमुक्त रस्त्यांनी करावी अशीही मागणी नागरिकांतून होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नागरिकांच्या मागणीकडे कसे पाहतात याबाबत उत्सुकता आहे.