Pune: पुणे येथे स्कूल बसखाली चिरडून 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू, परिसरात हळहळ
Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

कोरोना व्हायरस महामारीत बंद असलेल्या शाळा प्रदीर्घ काळानंतर सुरु झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांसह शालेय वर्तुळात मोठा उत्साह आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना एका शालेच्या आनंदात मात्र आनंदावर विरजण पडले आहे. पुणे (Pune) येथील एका 12 वर्षीय विद्यार्थ्याचा स्कूलबस (School Bus Accident) खाली आल्याने चिरडून मृत्यू झाला. अर्णव अमोल निकम (वय १२, रा. राजयोग टाऊनशिप, वडगाव खुर्द) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सिंहगड रस्ता येथील वडगाव खुर्द भागात ही घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार मंगळवारी (14 जून) दुपारी राजयोग सोसायटी परिसरात ब्लॅासम पब्लिक स्कूलची बस विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आली होती. या वेळी अर्णव याच्यासह बसमधील इतरही विद्यार्थी खाली उतरले. दरम्यान, या मुलांचे लक्ष बसकडे नव्हते. दुर्दैवाने याच वेळी बस चालक बस वळवत होता. बस वळवत असताना अर्णव बसच्या मागच्या चाकाखाली आला. या घटनेत तो चिरडला गेला आणि ठार झाला. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच घबराट पसलली. (हेही वाचा - Mumbai Train Accident: दादर येथे दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या इंजिनची एकमेकांना टक्कर, सर्व प्रवासी सुखरूप)

अपघाताची माहिती कळताच सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, उपनिरीक्षक किशोर तनपुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अर्णव याला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणात बसचालक चालक दत्तात्रय लक्ष्मण परेकर(वय 49, रा. धनकवडी) आणि रिया जाधव (वय-33, रा. नऱ्हे ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.