सज्जनगड

सातारा... हिरवाईने नटलेला जिल्हा ! सातारा म्हटले की डोळ्यासमोर येते ते महाबळेश्वर-पाचगणी आणि आता फुलांमुळे प्रसिद्ध झालेले कास, मात्र याव्यतिरिक्तही साताऱ्याची आभूषणे ठरावी अशी अनेक ठिकाणे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 'सज्जनगड'... समर्थ रामदास स्वामींचे समाधी स्थळ.

प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीच्या ज्या रांगा पूर्वेकडे जातात त्यापैकी एका रांगेवर सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे. सातारा शहराच्या पश्चिमेस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर हा दुर्ग उभा आहे.

फार पूर्वी आश्वालायन ऋषींचे वास्तव्य इथे होते म्हणून याला 'आश्वलायनगड' असेही म्हणतात. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने 11 व्या शतकात केली. 2 एप्रिल इ.स. 1673 मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला.आपल्या गुरूंना विश्रांती मिळावी म्हणून शिवाजी महाराजांनी या गडावर समर्थांसाठी मठ बांधून दिला. इ.स. 1676 साली समर्थ कायमस्वरुपी सज्जनगडावर वास्तव्यासाठी आले आणि इ.स. 1682 मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला त्यापूर्वी सहा वर्षे स्वामींचे वास्तव्य इथेच होते.

सातारा शहरातून गडावर जाण्यासाठी पक्का रोड आहे, गाडी अगदी गडाच्या पायथ्यापर्यंत जाते. साताऱ्यातून बस सेवाही उपलब्ध आहे, मात्र स्वतःचे वाहन असलेले बरे. रस्ता जरी दहा किमीचा असला तरी अजुबाजूच्या निसर्गामुळे तुम्ही कधी गडावर पोहोचलात समजतही नाही. स्वच्छ रस्ता, आजुबाजुला भरपूर झाडी, नागमोडी वळणे यामुळे तुम्ही अगदी कोकणात असल्याचा भास होतो.

पायथ्यापासून गडावर पोहचण्यासाठी जवळजवळ 100 एक पायऱ्या आहेत, मात्र समोर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा, खोल दऱ्या यामुळे चालण्याचा थकवाही जाणवत नाही. वर जाताना समर्थ स्थापित अकरा मारुत्यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत त्यामुळे वर पोहचूपर्यंत सर्व मारुत्यांचे दर्शन होते. अर्ध्या वाटेवर समर्थशिष्य कल्याण स्वामीचे मंदिर आहे. पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व दुसऱ्या बाजूस गौतमीचे मंदिर आहे. किल्ल्याचा दरवाजात श्रीधर स्वामींनी स्थापन केलेल्या मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर आहे. वर आल्यावर साधारण 50 पावलांवर समोरच रामाचे मंदिर आहे. ज्या ठिकाणी समर्थांना अग्निसंस्कार केला त्या ठिकाणी तळघरात समाधी मंदिर व त्यावरच हे राममंदिर छत्रपती संभाजीराजांनी बांधले. मंदिर अतिशय स्वच्छ आणि थंड आहे. मंदिरालगतच अशोकवन, वेणाबाईचे वृंदावन, ओवऱ्या, अक्काबाइचे वृंदावन, आणि समर्थांचा मठ या वास्तु आहेत. जीर्णोद्धार केलेल्या मठात शेजघर नावाची खोली आहे. त्यामधे पितळी खुरांचा पलंग, तंजावर मठाच्या मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र, समर्थांची कुबडी, गुप्ती, दंडा, सोटा, पाण्याचे दोन मोठे हंडे, पाणी पिण्याचा मोठा तांब्या, पिकदाणी, बदामी आकाराचा पानाचा डबा, वल्कले व प्रताप मारुतीची मूर्ती आहे.

गडाच्या मागच्या बाजून भल मोठ पटांगण आहे. कठड्यावर फिरण्यासाठी रस्ता बांधून ग्रिलिंग लावलेले आहे. या पटांगणातच धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे. कठड्यावर उभे राहून समोर पहिले तर अथांग पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा दिसतात, त्या पाहताना तुम्ही कधी स्वतःला हरवता समजतच नाही. याच कठड्यावरून खाली भला मोठ तलाव दिसतो, याच तलावातून पाईपलाईन करून गडावर पाणी घेतले आहे. तसे गडावरही पाण्याची दोन मोठी तळे आहेत.

गड तसा फिरण्यासाठी लहानच आहे, अवघ्या अर्ध्या पाऊण तासच संपूर्ण गड फिरून होतो मात्र उंचावरून दिसणारे दृश्य पाहण्याची मजा काही औरच. गड विपुल वनश्रीने समृद्ध असा आहे, स्वच्छताही तशीच. पर्यटनस्थळासोबतच गडावरील धार्मिक वातावरण मंत्रमुग्ध करून टाकतं.

रामनवमी, हनुमान जयंतीला गडावर मोठ उत्सव भरतो, आम्ही हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी गेल्यामुळे गडावर अजीबात गर्दी नव्हती त्यामुळे संपूर्ण गड अगदी मनासारखा फिरून झाला. उन्हाळा असला तरी गडावर असलेल्या झाडांमुळे उन्हाच्या झळा जाणवल्या नाहीत मात्र पावसाळ्यातील गडाचे सौंदर्य हे अवर्णनीय आहे.

आख्खा एक दिवस थांबावे तसे इथे काही नाही, मात्र जर तुम्ही साताऱ्याजवळ असाल तर कास आणि ठेसेघर नंतर एखादी संध्याकाळ तुम्हाला एखाद्या शांत ठिकाणी व्यतीत करायची असेल तर तुम्ही सज्जनगडला नक्की भेट देऊ शकता.