गणपती बाप्पा (फाईल फोटो)

श्रावण महिना सुरु होताच सणांची सरबत्ती सुरु होते. त्यानंतर महिने बदलले तरी सणांचा रिघ काही संपत नाही. नागपंचमी, रक्षाबंधन, दहीहंडी आणि त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्री हे सण क्रमाने येतात. सणावाराच्या निमित्ताने गोडधोड खाणे होते. त्याचबरोबर गणेशोत्सव आणि नवरात्री यात प्रसादचे खास वैशिष्ट्य असते. पण प्रसादातही सतत गोड खावून अगदी मन भरते. मग एकच साखरफुटाणा, अर्धा पेढा अगदी नको नको म्हणत घेतला जातो. सगळीकडे तोचतोच प्रसाद खावून अगदी कंटाळा येतोच. पण त्याचबरोबर अति गोड खाणे आरोग्यासाठीही घातक ठरते. म्हणून यंदा प्रसादाला देऊया थोडा हेल्दी ट्विस्ट...

खोबरं

गणपतीत मोदकाच्या सारणापासून ते प्रसादापर्यंत खोबरं वापरलं जातं. खोबऱ्यामुळे शरीरातील स्निग्धता वाढते.

खसखस

सणासुदीला गोडाधोडावर अगदी ताव मारला जातो. हेल्थ, डाएट याकडे थोडे दुर्लक्षच होते. पण त्यामुळे पचनाचे विकार होण्याची शक्यता असते. मात्र खसखस पचन सुधारण्यास मदत करते.

खारीक

पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनशक्तीला चालना देण्यासाठी आणि भूक वाढवण्यासाठी खारीक फायदेशीर ठरतं.

खजूर

खजूरामुळे शरीरात ऊर्जा आणि बळ वाढवण्यास मदत होते.

खडीसाखर

सणावारात जेवणाचे गणित बिघडते. त्यामुळे पित्त वाढण्याची शक्यता असते. अशावेळी पित्त शमवण्यासाठी खडीसाखर उपयुक्त ठरते.

म्हणूनच प्रसादासाठी खोबरं, खारीक, खजूराचे तुकडे, खडीसाखर आणि खसखस घालून मिश्रण तयार करा. त्यामुळे हेल्दी आणि चविष्ट प्रसाद तयार होईल.