Tanaji Malusare Death Anniversary Date 2024: प्राणांचे बलिदान देऊन कोंढाणा घेतला, जाणून घ्या कधी आहे पराक्रमी वीर तानाजी मालुसरे यांचा स्मृतिदिन
Tanaji Malusare (संग्रहित-संपादित-प्रातिनिधिक प्रतिमा)

Tanaji Malusare Death Anniversary Date 2024: मराठ्यांचा इतिहासात असे अनेक पराक्रमी वीर होऊन गेले ज्यांची आठवण आजही काढली जाते. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील अशा अनेक लोकांनी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. यातीलच एक नाव म्हणजे तानाजी मालुसरे (Tanaji Malusare). आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह आपले बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर म्हणजेच तानाजी मालुसरे, ज्यांनी कोंढाणाच्या (सध्याचा सिंहगड) लढाईत आपल्या प्राणांचे बलिदान दिले. अशा या थोर सेनानीचा रविवार, 4 फेब्रुवारी रोजी स्मृतीदिन.

सिंहगडावर झालेली लढाई तानाजी मालुसरेंच्या बलिदानासाठी ओळखली जाते. 4 फेब्रुवारी रोजी 1670 रोजी या लढाईत त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्‍यांच्‍या जाण्‍याने छत्रपती शिवराय हळहळले होते आणि ‘गड आला पण सिंह’ गेला असे भावनिक उद्गार काढले होते. तानाजींना महाराजांनी सिंहाची उपमा दिली होती व कोंढाणाची नाव बदलून सिंहगड असे ठेवले गेले. तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जिवलग मित्र, निष्ठावंत मराठा सरदार आणि सैन्यामध्ये सेनापती होते. त्यांचा जन्म इसवी सन 1626 मध्ये महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात एका छोट्याशा गावात झाला.

तर पुरंदरच्या तहात शिवरायांनी जयसिंग यांस दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते. त्यातीलच एक कोंढाणा. किल्ल्यावर फडकत असणारा औरंगजेबचा झेंडा शिवाजी राजे आणि जिजाऊ साहेबांना सलत होता. कोंढाणा जिंकण्याबद्दल सल्लामसलत चालू असताना तानाजी मालूसरे यांनी मी कोंढाणा घेऊन येतो असे सांगितले. त्यावेळी त्यांचे मुलाचे लग्न होते, मात्र स्वतःच्या मुलाच्या लग्नापेक्षा त्यांनी सिंहगडाच्या लढाईला अग्रस्थान दिले.

त्यानंतर पाचशे मावळे सोबत घेऊन, ते 4 फेब्रुवारी 1670 च्या रात्री राजगडावरून कोंढाण्याच्या पायथ्याला पोहोचले. तिथून दोराच्या सहाय्याने ते वर गेले. साधारण तीनशे मावळे गडावर आले असतील इतक्यात गडावर शत्रू येत असल्याची खबर आली. त्यानंतर गडावर तीनशे मावळे आणि पंधराशे मुगल असा सामना जुंपला. किल्लेदार उदयभान राठोड आणि सुभेदार तानाजी मालुसरे एकमेकांसमोर ठाकले आणि या लढाईत नरवीर तानाजी यांना वीरमरण आले, मात्र पडता पडता त्यांनी कोंढाणा महाराजांना मिळवून दिला. (हेही वाचा: Shri Ram’s Story in Madrasas: आता मदरशांमध्ये शिकवली जाणार श्रीरामाची कथा; वक्फ बोर्डाने अभ्यासक्रमात केला समावेश, जाणून घ्या सविस्तर)

आजही पुण्याजवळील हा किल्ला तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची साक्ष देत डौलाने उभा आहे. सुभेदार तानाजी मालुसरे यांनी मोठे शौर्य दाखवून कोंढाणा किल्ला आणि आजूबाजूचा परिसर मुघलांच्या ताब्यातून मुक्त केला, यानंतर शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून त्यांच्या मित्राच्या आठवणीमध्ये ‘सिंहगड’ असे ठेवले. सिंहगडाची लढाई ही शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या घटनांपैकी एक आहे आणि ती तानाजी मालुसरेंमुळे ओळखली जाते.