Shri Ram’s Story in Madrasas: आता मदरशांमध्ये शिकवली जाणार श्रीरामाची कथा; वक्फ बोर्डाने अभ्यासक्रमात केला समावेश, जाणून घ्या सविस्तर
Ram lalla | Twitter

नुकतेच 22 जानेवारीला राम मंदिराचे (Ram Temple) उद्घाटन आणि राम मंदिराच्या गर्भगृहात राम लल्लाचा अभिषेक झाल्यानंतर संपूर्ण देश राममय झाला आहे. अशात उत्तराखंड वक्फ बोर्डाने (Uttarakhand’s Waqf Board) मदरसामध्ये शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता मदरशांमध्ये श्री रामकथा शिकवली जाणार आहे. मंडळाने नवीन अभ्यासक्रमात श्रीरामाची कथा समाविष्ट केली आहे. वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी गुरुवारी सांगितले की, यावर्षी मार्चमध्ये सुरू होणाऱ्या सत्रापासून नवीन अभ्यासक्रम लागू केला जाईल.

ते पुढे म्हणाले की, श्री राम हे एक अनुकरणीय चरित्र आहेत ज्यांना प्रत्येकाने ओळखले पाहिजे आणि त्याचे पालन केले पाहिजे. मदरशातील विद्यार्थ्यांना प्रेषित मोहम्मद तसेच श्रीराम यांच्या जीवनाविषयी शिकवले जाईल.’ वक्फ बोर्डाच्या अंतर्गत राज्यभरात 117 मदरसे चालवले जात आहेत. हा नवीन अभ्यासक्रम सुरुवातीला डेहराडून, नैनिताल, उधम सिंग नगर आणि हरिद्वारमध्ये शिकवला जाईल.

मदरशांच्या अभ्यासक्रमात बदल करून त्यात गणित आणि विज्ञान या विषयांसह आधुनिक विषयांचा समावेश करावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाने या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे आणि आता मुलांना भगवान रामाच्या जीवन मूल्यांबद्दल शिक्षण दिले जाईल.

(हेही वाचा: Puneri Dhol In Ayodhya: अयोध्येत हनुमान गढी समोर पुण्याच्या श्रीराम पथका कडून ढोल-ताशा वादन)

दरम्यान, भाजपने आपल्या सर्व खासदार, आमदार, मंत्री आणि संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपापल्या मतदारसंघातील ज्या लोकांना रामाचे दर्शन घ्यायचे आहे, अशा सर्वांना अयोध्येला नेण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर भाजपने अयोध्येत 25 हजार भाविकांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी राम भजन, कीर्तन, रामलीला असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचीही तयारी सुरू आहे.