Nag Panchami 2019: ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी; जाणून घ्या काय आहे नागपंचमी व्रताची पौराणिक कथा
नागपंचमी कथा (Photo Credits: Instagram)

Nag Panchami 2019: धार्मिक व्रक्त वैकल्ये, पूजा विधी यासाठी वर्षातील सर्वात महत्वाचा काळ म्हणजे श्रावण (Shravan). यावर्षी महाराष्ट्रात 2 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात सर्वात पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी. श्रावण महिन्यातील शुध्द पंचमीला नागपंचमी हा सण साजरा केला जातो. या दिवशी सुवासिनी नागाची, वारुळाची पूजा करतात. प्राणी व पक्षी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण साजरे करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत फार पुर्वी पासून आहे. म्हणूच आपल्याकडे नागपंचमी साजरी केली जाते.

महाराष्ट्रात नागपंचमीचा सण सर्वत्र साजरा केला जातो. घरात नागाची प्रतिमा काढून किंवा नागाच्या मुर्ती आणून पुजा केली जाते. पुजा करून त्याला दूध लाह्यांचा नैवद्य दाखवतात. या दिवशी नागाला ईजा होऊ नये म्हणून शेतकरी शेतात नागंर देखील फिरवत नाही. या दिवशी घरात विळी देखील वापरली जात नाही. या सणाला नववधू माहेरी येतात, झिम्मा फुगडी खेळतात. झाडाला झोके बांधुन झोके खेळतात. तर अशा या महत्वाच्या सणाच्या काही आख्यायिकाही आहेत.

फार वर्षापुर्वी ’नाग’ वंशाचे लोक भारतात रहात होते. त्यानंतर आर्य भारतात आले. आर्यं आणि नाग यांच्यात वारंवार होणारी भांडणे अस्तिक ऋषींनी मिटवली. म्हणूनच नाग लोकांनी हा आनंद नागपंचमीचा सण साजरा करून व्यक्त केला.

नागपंचमीबाबत दुसरी एक कथा अशी की, श्रीकृष्णाने कालियामर्दन करून त्याच्यावर विजय मिळवला तो दिवस होता श्रावण पंचमीचा. त्या दिवसापासून नागपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरु झाली. चला पाहूया या सणाची पौराणिक कथा काय आहे-

ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी,

‘आटपाट नगर होते, तिथे एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या. चातुर्मासात श्रावण आल्याने सर्व सुना आपापल्या माहेरी, आजोळी निघून गेल्या. मात्र धाकट्या सुनेला माहेरचे कोणीच नव्हते त्यामुळे मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असे समजून, नागोबा मला माहेराहून न्यावयास येईल, असे म्हणू लागली. (हेही वाचा: नाग पंचमी दिवशी नागोबाची पूजा करण्याचं महत्त्व काय? पहा यंदाचा शुभ मुहूर्त, विधी)

तिची भक्ती पाहून शेषभगवानास तिची दया आली. तो ब्राह्मणाचा वेष घेऊन या मुलीस घेऊन जाण्यासाठी आला. मुलीनेही सासऱ्याला हा आपला मामा असल्याचे सांगितले. त्यानंतर शेषभगवान तिला आपल्या वारुळात घेऊन गेले व तिला सर्वकाही सांगितले.

एके दिवशी नागाची नागीण बाळंत होत होती. या मुलीला हातात दिवा धरायला सांगितले. पिले वळवळ करू लागली, ही मुलगी भिऊन गेली. व तिच्या हातातील दिवा खाली पडला त्याने या बाळांची शेपूट जळाले. नागिणीने हे सर्व नागोबाला सांगितले त्यानंतर या मुलाला अपार संपत्ती देऊन तिची पाठवणी परत तिच्या सासरी केली गेली. नागाच्या मुलांना मोठे झाल्यावर या मुलीमुळे आपली शेपूट जळाल्याचे कळाले व त्यांनी याचा सूड घ्यायचे ठरवले. यासाठी ते तिच्या घरी गेले.

तो दिवस नागपंचमीचा होता. मुलगी आपल्या भावांची वाट पाहत होती. ते लवकर येत नाहीत हे पाहून तिने पाटावर व भिंतीवर नागांची चित्रे काढली, त्यांची पूजा केली. नागांना लाह्या, दूध यांचा नैवैद्य ठेवला. हा सर्व प्रकार दुरून नागांची पिल्ले पाहत होती. शेवटी हिने देवाची प्रार्थना केली, ‘जय नागोबा देवा, जिथ माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथे ते खुशाल असोत’. ही गोष्ट पाहून या नागांच्या मनातील राग निघून गेला. त्यांच्या मनात या मुलीविषयी दया निर्माण झाली. त्या रात्री ते तिथेच राहिले. पहाटे आपल्या बहिणीसाठी एक नवरत्नांचा हार ठेवून ते निघून गेले. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण !'