Mahadev Govind Ranade 119th Death Anniversary: महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्याविषयी माहित नसलेल्या '10' महत्त्वाच्या गोष्टी
MG Ranade (Photo Credits: Wikimedia Commons)

Mahadev Govind Ranade Death Anniversary: भारतात अनेक थोर समाजसुधारक होऊन गेले. त्यातील कायम स्मरणात राहील असे एक नाव म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते महादेव गोविंद रानडे यांची आज 119 वी पुण्यतिथी. रानडे यांचे सामाजिक कार्य आणि त्यांनी भारतासाठी दिलेले योगदान हे सांगावे तेवढे कमीच आहे. अतिशय शांत, हुशार आणि तितकेच जिद्दी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. न्या.रानडे यांना आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या. तसेच शिक्षण, समाजसेवा, राजकारण तसेच आर्थिक बाबतीत अमुल्य कार्य केले.

भारतातील सामाजिक परिस्थितीचा विचार करताना येथील समाजातील विविध समस्यांबद्दल न्या. रानडेंनी विचार मांडले. धर्म, जातीव्यवस्था, स्त्रियांचा दर्जा, शिक्षण, इ. बाबत सुधारणा त्यांनी सुचवल्या. अशा या थोर, कर्तृत्ववान व्यक्तिविषयी माहित नसलेल्या 10 महत्वपुर्ण गोष्टी:

1. न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 मध्ये निफाड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरात झाले.

2. न्या. रानडे हे भारत सरकार अर्थसमितीचे सदस्य वित्तीय समितीवर नियुक्त होणारे पहिले भारतीय होते.

3. विधवा पुर्नविवाह ही चळवळ सुरु करण्याबाबत ते आग्रही होते. त्यांची ही तळमळ बघता त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचे लग्न अण्णासाहेब कुर्लेकर यांच्या कन्येशी लावून दिले. पुढे जाऊन रानडे यांनी आपल्या पत्नीस खूप शिकवले.

4. न्या. रानडे यांच्या विधवा विवाहोत्तेजक मंडळाच्या माध्यमातून 1869 साली पुण्यात वेणूबाई परांजपे या विधवेचा विवाह लावून दिला.

5. रानडे यांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व होते. पुढे जाऊन रानडे यांना हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जाऊ लागले.

6. रानडे यांनी मराठी पत्रकारितेचा पाया घातल्यामुळे त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणूनही संबोधले जाऊ लागले.

7. भारतात सनदशीर राजकारणाचा पाया रानडे यांनीच घातला. ए.ओ.ह्यूम यांनी "भारतात 24 देशांचा विचार करणारी एकच व्यक्ती ती म्हणजे रानडे", अशा शब्दात रानडेंची प्रशंसा केली.

8. ज्याप्रमाणे गुलाबाचे सौंदर्य व सुगंध हे जसे वेगळे करता येत नाही, त्याप्रमाणे राजकारण व सामाजिक सुधारणा यांची फारकत करता येत नाही. असे त्यांचे मत होते. त्यांच्या अशा विचारांमुळे त्यांना 'भारतीय उदारमतवादाचे उद्दाते' असेही म्हटले जातं.

9. न्या. रानडे हे इ.सन 1878 मध्ये पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते.

10. महाराष्ट्राल पेशवाईनंतर आलेली प्रेतकळा उडवून सचेतन करण्याची काळजी आमरण वाहिनी अशा शब्दांत टिळकांनी न्या. रानडे यांचे वर्णन केले आहे.

या नव्या संक्रमणावस्थेत न्या. रानडेंचे समन्वयवादी, संयमित परंतु अचूक व नि:संदिग्ध विचार मार्गदर्शक ठरावेत असेच आहेत. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना लेटेस्टली मराठी कडून कोटी कोटी प्रणाम.