Bal Gangadhar Tilak Quotes in Marathi: 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, अशा शब्दांत इंग्रजी सरकारवर ताशेरे ओढणारे बाळ गंगाधर टिळक (Bal Gangadhar Tilak), म्हणजेच लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) यांची आज 166 वी जयंती. शिक्षक, समाजसुधारक, थोर विचारवंत, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक वक्ते, स्वातंत्र्यसैनिक अशी ओळख असलेल्या लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी 23 जुलै 1856 रोजी झाला. लहानपणापासूनच अन्यायाची चीड असल्याने पुढे भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी अमूल्य असे योगदान दिले. मराठा आणि केसरीद्वारे त्यांना मराठी पत्रकारितेचा चेहरा मोहराच बदलून टाकला. विविध सामाजिक विषयांवर भाष्य करून, त्यांनी तत्कालीन सरकारला त्यांची जागा दाखवून दिली. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ हे याचेच महत्वाचे उदाहरण.
प्रत्येक मुद्द्यावर घेतलेली ठाम भूमिका हे टिळकांचे वैशिष्ट्य त्यांच्या विचारांत स्पष्ट दिसते. आजही हे विचार आपल्यासाठी मार्गदर्शक तत्वे आहेत. आज लोकमान्य टिळक जयंतीचे औचित्य साधून चला पाहूया त्यांचे काही अनमोल विचार (Lokmanya Tilak Marathi Quotes)
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच'
'तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल गोणपाटा सारखा कराल, तर त्यातून परमेश्वर कसा दिसेल'
'मनुष्य स्वभावत: कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही'
'जुलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे तो परमार्थही नव्हे ती फक्त पशुवृत्ती होय'
'माणसाने माणसाला भ्यावे ही शरमेची गोष्ट आहे'
'स्वातंत्र्य म्हणजे विष, स्वराज्य म्हणजे दुध'
'पारतंत्र्यामुळे आमच्या लोकांची स्थितीच अशी झाली आहे की, राजकीय सुधारणा झाल्याखेरीज, स्वातंत्र्य मिळाल्याखेरीज आमची सामाजिक स्थिती सुधारावयाचीच नाही'
लोकमान्य टिळक हे फक्त उत्तम संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र अशा विविध विषयांचे सखोल ज्ञान त्यांना होते. ’ओरायन’ (Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) ही त्याची पहिली दोन पुस्तके. त्यांचे तिसरे पुस्तक ‘गीतारहस्य’ आजही अभ्यासाचा विषय समजले जाते. यामध्ये त्यांनी भगवद्गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे.