How To Store Fruits And Vegetables (Photo Credits: Pixabay)

कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले लॉकडाऊन (Lockdown) आता 3  मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. या लॉक डाऊन 2  दरम्यान काही नियम हे शिथिल करण्यात आले आहेत. केंद्राने जारी केलेल्या नियमावलीनुसार, यापुढे भाजी, किराणा आणि अन्य दुकाने आता सुरु ठेवता येणार असल्याने निदान जेवणासाठी सामान मिळणार हे स्पष्ट आहे. मात्र या वस्तूंच्या खरेदीसाठी वारंवार बाहेर जाणे हे तुम्हालाही कंटाळवाणे वाटत असेल हो ना? म्ह्णूनच आपण अधिक सामान घरी आणून ठेवत असाल पण या वस्तू लागलिच वापरल्या गेल्या नाहीत तर त्या खराब होण्याची शक्यता असते. असे नुकसान होऊ नये म्ह्णून आज आपण काही सोप्प्या किचन टिप्स पाहणार आहोत. चला तर मग घरी फ्रीज मध्ये भाज्या, फळे, दूध, असे सामान अधिक काळ खराब न होऊ देता कसे टिकवून ठेवता येईल हे जाणून घेऊयात .. Summer Health Tips: उन्हाळ्यात ताक कधी आणि कसे प्यावे?

प्लास्टिक पिशवीत स्टोअर करणे टाळा

अनेकदा आपण भाज्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणून तसेच फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवतो मात्र यामुळे वस्तू खराब होतात. त्यामुळे निदान जाडसर प्लॅस्टिकच्या पिशवीचा, डब्याचा वापर करा. कागदाची पिशवी हा देखील उत्तम पर्याय आहे.

पालेभाज्यांचे Blanching करा

ब्लांचिंग म्हणजेच भाज्या गरम पाण्यात उकळवणे. पालेभाज्यांच्या बाबत हा पर्याय वापरल्याने भाजी टिकून राहायला मदत होते. यासाठी भाजी पूर्ण शिजवण्याची गरज नाही केवळ हलकी वाफ देऊन मग फ्रीज मध्ये थंड करण्यासाठी स्टोअर करू शकता.

कांदे बटाटे कसे ठेवाल

कांदे बटाटे हे फ्रीज मध्ये ठेवण्याची गरज नाही ते मोकळे करून बाहेरही स्टोअर करू शकता. या वस्तू अधिक काळ टिकतात फक्त त्या थोड्या सैल आणि हवेशीर ठेवाव्यात.

मिरची कोथिंबीर कशी स्टोअर कराल

पालेभाज्या, कोथिंबीर, मिरची नीट निवडून वर्तमानपत्रात गुंडाळून मग प्लॅस्टीकच्या डब्यात घालून फ्रिजमधे ठेवाव्यात. प्रत्येक वेळी बाहेर काढल्यानंतर डबा पुसून कोरडा करावा.

आलं लसूण पेस्ट स्टोअर कशी कराल

लसूण सोलून चमचाभर तेलात वाटून घ्या तसेच आल्याचे वरचे साल काढून टाकून मग त्याचे तुकडे करून त्यांना किंचित मीठ लावून मग त्यांची पेस्ट करुन फ्रिजमधे ठेवल्यास आठवडाभर छान टिकते.

दूध - दही कसे टिकवाल

दुध फ्रीज बाहेर टिकवायचे असेल तर त्या मध्ये सोडा किवा साखर घालून ठेवा. दुध विकत आणून काही तासांनी गरम करावे. तसेच दही फार काळ बाहेर ठेवल्याने आंबट होते, खराब होते. ते टाळण्यासाठी दह्यामध्ये 3 चमचे मध मिसळा.

दरम्यान, लॉक डाऊन सोबतच आता उन्हाळाही सुरु झाल्याने वस्तू लवकर खराब होतात. यामुळे नुकसान तर होतेच पण आता वाटेल तेव्हा बाहेर पडून वस्तू खरेदी सुद्धा करता येणार नाहीयेत. अशावेळी अगोदरच खबरदारी घेणे हे उत्तम ठरेल.