Happy New Year 2020: उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. अनेकजण नवीन वर्षाअगोदर वर्षभरात करावयाच्या संकल्पांची यादी तयार करत असतात. दररोज व्यायाम करायचा, पैशांची गुंतवणूक, एखादा नवीन छंद जोपासायचा किंवा आपली एखादी वाईट सवय कायमची सोडायची, भरपूर वाचन करायचं, अशा अनेक गोष्टींचा संकल्प केला जातो. तुम्हीही यंदा नवीन वर्षाचा संकल्प करायचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
अनेकदा नवीन वर्षात करावयाचे संकल्प पूर्ण होत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा हा विनोदाचा विषय ठरतो. परंतु, तुम्हाला माहित आहे का? एका आकडेवारीनुसार, केवळ 8 टक्के लोक नवीन वर्षाचे संकल्प पूर्ण करण्यात यशस्वी ठरतात. परंतु, हे संकल्प केवळ सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे नसतात. याचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे प्रत्येक वर्षी असे संकल्प करा जेणे करून तुम्हाला यशाची पायरी चढण्यास मदत होईल. तसेच या संकल्पांमुळे तुमचे व्यक्तीमत्वात चांगले बदल होतील.
नवीन वर्षाच कार हे संकल्प -
विजेची बचत करा -
नवीन वर्षापासून वीजेची बचत होईल अशा गोष्टी करा. थंडीच्या दिवसात पंखा, एसी, लाईट इत्यादी उपकरणे गरज नसल्यास बंद ठेवा. दिवसा उजेडासाठी खिडक्या उघड्या ठेवणे, निदान बाथरूम मधून आल्यावर बाथरूमचा दिवा बंद करा. 2017 मध्ये रेल्वे विभागाने मोठ्या प्रमाणात विजेची बचत केली होती. या बचतीमुळे तब्बल 5 हजार कोटी रुपये वाचले होते. त्यामुळे आपणही वीजेची बचत करून याला हातभार लावू शकतो.
पाण्याचा अपव्यय टाळा -
असं म्हटलं जात की, तिसरं जागतिक युद्ध पाण्यासाठी होईल. परंतु, तुम्ही पाणी जपून वापरलं तर हे युध्द नक्की टाळता येईल. भूजल पातळी वाढवण्यासाठी 'पाणी आडवा, पाणी जिरवा' मोहीमेला चालना द्या. घरात विनाकारण होणारा पाण्याचा वापर टाळा. कमी पाण्यात अंघोळ, कपडे धुणे, आदी गोष्टी करा. तसेच पाण्याचा पूर्नवापर करता आल्यास मोठा फायदा होऊ शकतो. सध्या केपटाऊन या देशात मोठं जलसंकट ओढवलं आहे. तेथे पाणी मिळण कठीण झालं आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करणं हा यंदाचा चांगाला संकल्प ठरू शकतो.
पर्यावरणाचा ऱ्हास टाळा -
माणवाचे जीवन हे निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे या निर्गावर कधीही कुऱ्हाड चालू नका. कारण ही कुऱ्हाड तुमच्याच पायावर बसण्याची शक्यता असते. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी प्लॉस्टिकचा वापर टाळा. नवीन झाडे लावून ते वाचवा. समुद्र किनाऱ्यावर कचरा करू नका. यंदा आपल्या नावाने जास्तीत-जास्त झाडे लावून ती जगवा. तुम्ही लावलेल्या एका झाडामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यास नक्की मदत होईल. सण, उत्सव हे आपल्या आनंदाचा भाग असले तरी, ते साजरे करताना त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये, याची काळजी घ्या.
सोशल मीडियावरील अफवांना थारा देऊ नका -
सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेऊ नका. तुम्हाला व्हॉट्सअॅप ग्रुपवर फॉरवर्ड मेसेज येत असतील तर त्यातील तथ्य समजून न घेता ते फॉरवर्ड करू नका. तुम्ही असे मेसेज फॉरवर्ड केल्यामुळे अफवा पसरण्यास मदत होते. तसेच अनेकदा एखाद्या बातमीवर क्लिक केल्याने तुमची खाजगी माहिती चोरली जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे अशा मेसेजपासून दूर राहा.
सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नका -
पर्यावरण प्रदुषणमुक्त आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नका. अनेकदा काही लोक आपल्या घरातील कचरा रस्त्यावर आणून टाकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा प्रदुषण होते. तसेच आपल्या आजूबाजूचा परिसर प्रदुषित होतो. तसेच घरातील ओला आणि सुक्या कचऱ्याची वेगवेगळी विल्हेवाट लावा.