'गाढविणीच्या दुधाचे' आश्चर्यकारक फायदे; गायी, म्हैशीच्या दुधापेक्षाही मानले जाते पौष्टिक, लहान बाळांसाठी ठरू शकते वरदान
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित-संपादित प्रतिमा)

भारतात दुग्धजन्य पदार्थांचे (Dairy Products) स्वतःचे असे मोठे मार्केट आहे. देशात विविध प्राण्यांपासून काढण्यात आलेल्या दुधाची विक्री होते. यामध्ये मुख्यत्वे गायीच्या आणि म्हैशीच्या दुधाचा समावेश होतो, कारण ते पौष्टिक समजले जाते. मात्र तुम्हाला असे सांगितले की यापेक्षाही गाढविणीचे दुध (Donkey’s Milk) हे अधिक पौष्टिक आहे, तुमचा विश्वास बसेल? मात्र हे सत्य आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये 10 मिली गाढविणीच्या दुधासाठी तब्बल 50 रुपये असा दर आहे. यासाठी लोकांच्या रांगा लागतात. इतिहासामाध्येही या दुधाची महती आढळते.

गाढविणीच्या दुधाचे फायदे - 

  • गाढविणीचे दूध शक्तीदायक, स्थिरता आणणारे, उष्ण, किंचित आंबट व खारट असून रुक्ष आहे. त्यात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असते. सर्व प्रकारचे वातविकार, अर्धांगवात, पक्षाघात (हातपायावरून वारे जाणे) हे रोग या दुधाने बरे होतात.
  • गाढविणीच्या दुधामध्ये व्हिटॅमिन बी, बी-12 यांची मात्रा; तसेच उष्मांक जास्त आहेत. आईच्या दुधापेक्षा गाढविणीच्या दुधामध्ये 60 पटींनी जास्त व्हिटॅमिन सी आहे.
  • एक वर्षांच्या आतील बालकाला हे दुध अमृत आहे. हे दुध श्वसनविकारावर जालीम औषध समजले जाते. सर्दीच्या आजारात लहान मुलांची छाती भरल्याने श्वसनास त्रास होतो. हा त्रास गाढविणीचे दूध दिल्यानंतर तत्काळ कमी होत असल्याचे सांगण्यात येते.
  • गाढविणीचे दूध विषबाधेवर, तापासाठी, झटके येत असतील तर, डोळ्यांच्या रोगावर, दंतरोगावर, तसेच प्रजननसंबंधी रोगांवर गुणकारी असल्याचे नमूद केले आहे.
  • टीबी आणि मधुमेह अशा आजारांसाठी गाढविणीचे दुध घेण्याचा सल्ला दिला जातो. या दुधामध्ये शर्करेचे प्रमाण फार कमी असते त्यामुळे मधुमेह असलेली व्यक्त या दुधाचे सेवन करू शकते.
  • सौंदर्यप्रसाधन म्हणून हे दुध फार उपयुक्त आहे. गाढविणीच्या दूधामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होण्य़ास मदत होते. तसेच या दुधामुळे शरीराची कातडी ही मऊ, मुलायम व चमकदार होते असे वैद्यकाचे म्हणणे आहे.
  • इजिप्तची राणी सौंदर्यसम्राज्ञी क्लिओपात्रा गाढविणीच्या दुधात अंघोळ करत असल्याचे नमूद आहे. याकरता तिच्या पशुशाळेमध्ये सातशे गाढविणी सांभाळल्या होत्या. हेच आपल्या सौंदर्याचे रहस्य असल्याचे तिने सांगितले होते. (हेही वाचा: देशातील पहिला प्रयोग: आता अमूल विकणार बाटलीबंद उंटीनीचे दुध; पाहा काय आहे किंमत)

मात्र ध्यानात असुद्या, गाढविण जास्त दुध देऊ शकत नाही, हे दुध साठवून ठेवणे शक्य नाही. त्यामुळे दुध काढल्या काढल्या घेणे गरजेचे असते. या दुधाला हवेचा संपर्क आल्यास दुधात जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो.

(सूचना : या लेखाचा उद्देश हा माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)