उंटीनीचे धून (संग्रहित- संपादित प्रतिमा)

गुजरात (Gujarat) मध्ये अमूल (Amul)च्या उत्पादनांची विक्री करणारे, 18 डेरी असणारे सहकारी महासंघ गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (GCMMF) राज्यात तीन ठिकाणी उंटीनीच्या दुधाची (Camel Milk) विक्री करणार आहे. उंटीनीचे दूध बाजारात आणण्यासाठी अन्न सुरक्षा नियामक असलेल्या फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऍथॉरिटी ऑफ इंडियाची मान्यता मिळविण्यात ‘अमूल’ला यश आले आहे. अमूल या उंटीनीच्या दुधाची बाटलीमधून विक्री करणार आहे. कच्छ येथील कंपनीच्या डेअरीमधील उंटीणीच्या या दुधाच्या 500 मिली लिटर बाटलीची किंमत 50 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

गुजरातच्या काही भागात राजस्थानात उंटाच्या दुधाचा वापर सर्वसामान्य असला तरी, देशाच्या बहुतांश भागात नागरिकांना या दुधाचा फारसा परिचय नाही. उंटाच्या दुधाचे अनेक फायदे आहेत, ही गोष्ट ध्यानात घेऊन अमूलने या बाटलीबंद उंटाच्या दुधाची योजना आखली आहे. उंटाचे दूध बाजारात आणताना त्याचा तीव्र वास दूर करण्यासाठी काही प्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला 4 ते 5 हजार लिटर दुधाचे उत्पादन घेतले जाणार आहे, त्यानंतर ग्राहकांचा प्रतिसाद पाहून याचे उत्पादन वाढवले जाईल. (हेही वाचा : बाटलीबंद दुध महागणार, 10 ते 15 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता)

उंटाच्या दुधामुळे शरिरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते. जर कुणाला बुद्धीची समस्या असेल तर उंटाच्या दुधाचा फायदा होतो. उंटाच्या दुधात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. याचे सेवन केल्यामुळे हाडे मजबूत होतात. उंटाचे दूध प्यायल्यास डायबिटीज सारखे रोग कमी होतात. या दुधाच्या एका लीटरमध्ये 52 युनिट इन्सिलीन असते. इतर आजारांबरोबरच त्वचेचा आजार दूर करण्यासाठी या उंटाच्या दुधाचा सर्वाधिक फायदा होतो.

याआधी उंटाच्या दुधाचे चॉकलेट बाजारात आले होते, मात्र उंटाचे दुध बाजारात आणण्याचा देशामधील हा पहिलाच प्रयोग आहे, त्यामुळे ग्राहक याला कसा प्रतिसाद ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.