भारतातील तीन ऋतूंपैकी उन्हाळा हा सर्वात त्रासदायक असा ऋतू आहे. याला मुख्य कारण म्हणजे उकाड्यामुळे शरीरातून वाहणा-या घामाच्या धारा. या घामाच्या धाराही अगांची लाहीलाही होते आणि अंगाला खाज सुटते. हळूहळू त्वचेवर लाल पुरळ येतात, ज्याला आपण 'घामोळ' म्हणतो. अंगावर येणारा घाम जास्त काळ त्वचेवर राहिल्याने ते त्वचेच्या आत जातात आणि ज्यामुळे ग्रंथींना सूज येते त्यालाच आपण घामोळे म्हणतो. या घामोळ्यापासून येणा-या खाजेपासून स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी आपण अनेक घामोळ्याची पावडर किंवा लोशन लावतो.
मात्र ही पावडर किंवा औषधे सर्वांच्याच त्वेचला सूट होतील असे नाही. त्यामुळे घरच्या घरी झटपट नैसर्गिक उपायांनी आपण ही घामोळ्यामुळे येणारी खाज कमी करु शकता.
1. काकडी
एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून घ्या. त्यात काकडीचा एक काप बुडवून ती घामोळ्यावर 10 मिनिटे चोळा. खाज कमी होईल.
2. कडूलिंब
कडूलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून लावल्याने घामोळयांची समस्या दूर होते. तसेच सकाळी अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पानं उकळवून त्याने अंघोळ केल्यानेही फायदा होतो. कडूलिंबाच्या पानांनी त्वचेचे इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते.
3. कच्चा बटाटा
कच्च्या बटाट्याच्या रसात गुलाब पाणी मिसळून घामोळ्या आलेल्या ठिकाणी लावावे. हे मिश्रण 20 मिनिटे तसेच लावून ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून 3 वेळा हा उपाय करा.
हेदेखील वाचा- Summer Health Tips: खरबूज खाल्ल्याने उन्हाळ्यात 'या' आजारांपासून स्वत:ला दूर ठेवण्यास होईल मदत
4. बर्फाचे खडे
एका फडक्यात बर्फाचे खडे टाका. आणि हे खडे घामोळ्यावर 10 मिनिटे चोळा.
5. कोरफड
एक चमचा कोरफडची जेल घेऊन ती 20 मिनिटे घामोळ्यावर चोळा. असे दिवसातून 3 वेळा करा.
घामोळ्या अधिकतर पाठ, पाय, हात आणि गळ्यावर येतात. यासाठी बाजारात अनेक पर्याय, उत्पादने उपलब्ध आहेत परंतु हे पर्याय तात्पुरते असतात. या पर्यायांनी घामोळ्या जाण्याऐवजी रिअॅक्शन होण्याचाही धोका अधिक असतो. त्यामुळे सोप्या, घरगुती उपचारांनी घामोळ्यांची समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते. उन्हाळ्यात थंड पाण्याने दिवसातून 2-3 वेळा आंघोळ करणे हा देखील उत्तम उपाय आहे.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)