Heatwave | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

उन्हाळ्यातील वाढते तापमान आणि उष्णता अनेकांच्या शरीरावर आणि मनावर परिणाम करतात, ज्यामुळे थकवा (Summer Fatigue), अशक्तपणा आणि सुस्ती जाणवू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते याची अनेक कारणे आहेत, जसे की, घामामुळे डिहाइड्रेशन, जास्त उष्णतेचा संपर्क, लांबलेल्या दिवसांमुळे झोप बिघडणे, शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठीची मेहनत इ. डिहाइड्रेशनमुळे शरीरातील पाणी आणि महत्त्वाची क्षार कमी होतात, ज्यामुळे ऊर्जा संपते. जास्त वेळ उष्णतेत राहिल्याने शरीराची थंडावा राखण्याची यंत्रणा तणावाखाली येते, परिणामी थकवा येतो. यासह जड, तेलकट किंवा गोड पदार्थ खाणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे थकवा आणखी वाढतो. याची लक्षणे म्हणजे सुस्ती, चिडचिड आणि एकाग्रतेची कमतरता.

गंभीर लक्षणे-

उष्णतेमुळे शरीराला आपले तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, आणि घामामुळे पाण्यासोबतच शरीरातील क्षारही निघून जातात. यामुळे थकवा, डोकेदुखी किंवा अशक्तपणा येऊ शकतो. जर तुम्ही बाहेर काम करत असाल किंवा उन्हात जास्त वेळ घालवत असाल, तर ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. काही लोक गोड पेय किंवा जंक फूड खाऊन थकवा कमी करायचा प्रयत्न करतात, पण यामुळे उलट थकवा वाढतो. काही वेळा अशक्तपणा, डोकेदुखी, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, रक्तदाब कमी होणे, बेशुद्धावस्था​ अशी गंभीर लक्षणेही दिसतात.

जीवनशैलीत करा बदल-

या थकव्यावर मात करण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचे आहे. पाणी पिणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने पाणी घेत राहावे, जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही. सकाळी किंवा संध्याकाळी बाहेर पडावे, ज्यावेळी उष्णता कमी असेल, आणि शक्यतो सुती हलके कपडे घालावेत, जे घाम शोषून शरीराला थंड ठेवतील. रात्री 7-8 तास झोप घेण्यासाठी झोपण्याची वेळ निश्चित करावी आणि झोपण्यापूर्वी थंड पाण्याने अंघोळ करावी, ज्यामुळे शरीराचे तापमान कमी होईल.

खाण्यावरही विशेष लक्ष द्यावे लागेल. जड आणि तळलेले पदार्थ टाळावेत, कारण ते पचायला जड असतात आणि शरीरावर ताण येतो. त्याऐवजी दही, ताक, लिंबू पाणी यांसारखे थंड आणि हलके पदार्थ खावेत, जे पचायला सोपे असतात आणि ऊर्जा देतात. व्यायाम करायचा असेल तर तो घरात किंवा थंड वेळेत करावा, जेणेकरून उष्णतेमुळे अडचण होणार नाही. या सर्व गोष्टींचा अवलंब केल्याने ग्रीष्मकालीन थकवा कमी होऊन तुम्ही दिवसभर उत्साही राहू शकता. (हेही वाचा: Advisory On Heatwave: नवी मुंबईकरांनो लक्ष द्या! राज्यात तापमानात वाढ, उष्णतेच्या लाटेबाबत काळजी घेण्यासाठी महानगरपालिकेने जारी केल्या सूचना)

करू शकता काही सोप्या गोष्टी-

हा थकवा टाळण्यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील. दररोज लिंबू पाणी किंवा नारळ पाणी यासारखे इलेक्ट्रोलाइट्स असलेले पेय घ्यावे. काकडी, कलिंगड आणि हिरव्या पालेभाज्या यांसारखे हलके आणि पाणीदार पदार्थ खावेत. डोके झाकून ठेवावे. थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करावा. दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवावेत. अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेली पेय पिणे टाळा.

(टीप: या लेखातील माहिती इंटरनेट आधारीत आहे, कोणत्याही आरोग्य समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)